Crime News pudhari photo
सातारा

Satara Crime : फटाका स्टॉलला आग लागल्याने युवकावर हल्ला

धुमश्चक्री होऊन दगड, रॉड, दांडक्याने केलेल्या हल्ल्यात एकजण गंभीर

पुढारी वृत्तसेवा

कराड : मुख्य चौकातील फटाका स्टॉलसमोर फटाके लावल्यानंतर एका ठिणगीने फटाका स्टॉल आगीत खाक झाल्याची घटना रेठरे बुद्रूक (ता. कराड) येथे घडली आहे. या घटनेनंतर धुमश्चक्री होऊन दगड, रॉड, दांडक्याने केलेल्या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी झाला. जखमीला कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी तंटामुक्ती अध्यक्षांसह पाच संशयितांना कराड तालुका पोलिसांनी अटक केली आहे.

रणजित शिवाजी भोसले (३१) असे जखमीचे नाव असून याप्रकरणी राहुल शिवाजी भोसले (एसटी चालक) यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून अखिल अशोकराव मोहिते (२९), रेठरेचे तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय ऊर्फ आबा शिवाजीराव मोहिते (५५), विजय शिवाजीराव मोहिते (४९), विराज रामचंद्र मोहिते (२६) आणि ऋषिकेश रावसाहेब महाडीक (४०, सर्व रा. रेठरे बुद्रूक) यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाले. तसेच संशयितांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अखिल मोहिते याने गावातील मुख्य चौकात फटाक्यांचा स्टॉल लावला होता. या स्टॉलसमोर सोमवारी ९ नोव्हेंबरला रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास जखमी रणजित भोसले याने फटाके लावले आणि याच फटाक्यामधील एक ठिणगी उडून अखिल मोहिते यांच्या स्टॉलला आग लागली. त्यानंतर काही क्षणातच फटाक्यांच्या स्टॉलला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. यानंतर भोसले याला जाब विचारल्याने धुमश्चक्री उडाली आणि मारामारीत रणजित भोसले याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. पाचही संशयितांना ताब्यात घेत अटक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT