सातारा : वृषभ जाधव याच्या खूनप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा आणखी दोघांना अटक केल्यानंतर शनिवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. संशयितांना 6 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. आतापर्यंत शाहूपुरी पोलिसांनी या गुन्ह्यातील चार दुचाकी वाहने जप्त केली आहेत.
दरम्यान, तिसऱ्या दिवशीही या प्रकरणावरून तणाव होता. यश संदीप मांढरे (वय 20, रा. करंजे पेठ, सातारा) व रोहन गणेश कांबळे (वय 20, रा. गुरुवार पेठ, सातारा) अशी अटक केलेल्या व पोलिस कोठडी सुनावलेल्यांची नावे आहेत. वृषभ जाधव याच्यावर गुरुवारी भरदुपारी कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांनी करंजे येथील आंदेकर चौकात हल्ला करण्यात आला. वृषभला जखमी केल्यानंतर हल्लेखोरांनी जखमी अवस्थेत दुचाकीवरून मंगळवार पेठेत नेले. त्या ठिकाणी पुन्हा कोयत्यांनी हल्ला करण्यात आला. या क्रूर हत्येने सातारा हादरुन गेला आहे.
वृषभ जाधव याच्या खून प्रकरणी त्याचा चुलत भाऊ श्रेयश जाधव याने 11 जणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा केला. शाहूपुरी पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर शुक्रवारी खूनप्रकरणी 5 जणांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावली. शाहूपुरी पोलिसांनी इतर संशयितांचा शोध घेतला असता शुक्रवारीच रात्री खूनप्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली. शनिवारी या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. या तपासादरम्यान हल्लेखोरांनी गुन्ह्यांमध्ये जी वाहने वापरली होती त्यापैकी 4 दुचाकी वाहने जप्त केली आहेत.
आता पाच संशयित आरोपी पोलिस कोठडीत असल्याने हल्ल्यात वापरलेले कोयते देखील लवकरच जप्त केले जातील. दरम्यान, गुरुवारी झालेल्या या हल्ल्यानंतर करंजे, मंगळवार पेठ, सिव्हील व रविवार पेठेत तणावाचे वातावरण होते. गेले दोन दिवसही तणावाचे हे वातवरण कायम राहिले आहे. शनिवारी वृषभ जाधव याचे कुटुंबिय सातारा पोलिस मुख्यालयात गेले होते. यावेळी त्यांनी सर्व संशयितांना अटक करण्याची मागणी केली. तसे न झाल्यास 26 जानेवारी रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे.