सातारा : डबेवाडी (ता. सातारा) येथे जुन्या भांडणाच्या कारणातून झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी एकाने अल्पवयीन साथीदारासोबत विरोधकाच्या खुनाचा कट रचला. मात्र, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या (एलसीबी) पथकाने त्यांचे मनसुबे उधळून लावत दोघांना हिसका दाखवला. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन बंदुका, जिवंत काडतुसे, कुकरी, सुरा असा साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
‘एलसीबी’चे प्रमुख पोनि विश्वजित घोडके यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार करण जोतिराम चव्हाण (वय 21, रा. डबेवाडी) याने त्याला मारहाण करणाऱ्याला जिवे मारण्यासाठी बंदूक आणली आहे. त्याच्यासोबत इतर साथीदार आहेत. यानंतर एलसीबी पोलिसांचे पथक तयार केले. त्यानुसार पथक डबेवाडी येथे गेले असता तेथे दुचाकी क्रमांक एमएच 11 डीएस 8743 यावर संशयित आरोपी व आणखी एकजण होता. पोलिसांना पाहताच तो पळून जाऊ लागला.
मात्र, पोलिसांनी त्याला पकडले. त्यांच्याकडे दोन पिस्तूल व हत्यारे सापडली. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, पोनि विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास झाला.
दोन पिस्तूल, पाच काडतुसे...
एलसीबी पथकाने संशयितांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे 2 देशी बनावटी पिस्तूल, 5 जिवंत काडतुसे, 1 सुरा, 2 कुकरी, 2 मोबाईल व 1 दुचाकी असा एकूण 3 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला. पोलिसांनी दोघांकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांनी खुनाचा कट रचत असल्याची कबुली दिली. मात्र, दुसरा संशयित अल्पवयीन निघाला. यामुळे त्याला ताब्यात घेतले.