कराड : बेकायदा विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या दोन संशयितांना कराड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सैदापूर (ता. कराड) येथील कृष्णा कॅनॉल परिसरात पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली आहे.
अल्तमश ऊर्फ मोन्या हारुण तांबोळी (वय 25, रा. पालकर वाडा, मंगळवार पेठ कराड) आणि ओमकार दिपक जाधव (वय 22, रा. होली फॅमिली स्कूलजवळ, विद्यानगर) अशी संशयितांची नावे आहेत. दोन्ही संशयित कृष्णा कॅनॉल परिसरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील यांच्या सूचनेनुसार सहय्यक पोलिस निरीक्षक अमित बाबर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला होता. संशयितांकडून पिस्तुलासह जिवंत काडतुसे, मोबाईल व दुचाकी जप्त करण्यात आली आहे.