सातारा : साताऱ्यातील गुन्हेगारीत बारक्यांना सामील करण्याचा नवा पॅटर्न सुरु झाला आहे. भाईलोक हे लहान मुलांचे केक कापून वाढदिवस जल्लोषी करुन त्यांना बूट, कपडे अशा महागड्या वस्तू गिफ्ट देवून ठरवून गँगमध्ये ओढत आहेत. प्रतिस्पर्धीचा काटा काढण्यासाठी व कारवाईतून बचाव करण्याच्या या घातकी आयडीया समोर येत आहेत. भाई भावनिक झाला की हाच बारक्या थेट बंदूक घेवून ढिशक्याव् ढिशक्याव् करत मर्डर करत आहे.
सातारा, वाई, कराड याठिकाणी गेल्या पाच वर्षात खुनासारख्या गंभीर घटनेत तसेच चोऱ्यामाऱ्या करण्यासाठी लहान मुलांचा सर्रास सहभाग वाढत आहे. बारक्यांमध्ये प्रामुख्याने झोपडपट्टीतील, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली मुले तसेच पालकांचे लक्ष नसलेली व काहीतरी हटके करायचे आहे, दहशत माजवायची आहे अशी मुले ठरवून लक्ष्य केले जात आहे. यासाठी भाई व भाईंचे पंटर प्रामुख्याने कॉलेज परिसरात बस्तान मांडून आहेत. इथेच भाईगिरी वाढवण्यासाठी लागण्याऱ्या मुलांची चक्क भरती केली जात आहे. शाळा, कॉलेज आणि खासगी क्लास बाहेर साताऱ्यात राडेबाजी रोजची झाली आहे. मिसरुड न फुटलेल्या पोरांच्या उघड उघड टोळ्या आहेत. घरातील दुचाकी परस्पर गाड्या घेवून ही पोरं ब्रुंग ब्रुंग करत गाड्या चालवत आहेत.
शाळेबाहेर एकमेकांना खुन्नशीने पाहणे, दुचाकीवरुन कट मरणे, तिच्याकडे कुणी बघायचे नाही अशा कारणातून पोरांची सर्रास झंगड-पकड होत आहे. कपडे फाटेपर्यंत, तांगडून एकमेकांना हाणले जात आहे.
बारक्यांना गँगमध्ये असे जातेय ओढले...
सातारच्या गुन्हेगारीत गँगमध्ये मुले वाढवण्यासाठी सोपी प्रोसिजर राबवली जात आहे. ज्या पोराचा वाढदिवस आहे त्याचा फ्लेक्स लावून त्याची हवा केली जाते. वाढदिवसाला भव्यदिव्य घोळक्याने केक कापला जातो. याशिवाय बूट, कपडे दिली जातात. अधूनमधून जेवणं, दारु, बिअर पाजली जाते. यामुळे पोरगं येड होवून जातं. भाईने आपल्यासाठी लै काय केले, अशी भोळी भाबडी भावना त्याची होते. पोरगं एकदा टप्प्यात आले की हाच भाई इमोशनल ड्रामा करतो. मला अमुक नडतोय, तमुक माझ्या मागावर आहे. भाईचे हे टेन्शन पाहून बारक्या त्याचा सारा भार स्वत:च्या शिरावर घेतो. पुढे हाच भाई बंदूका, तलवारी देवून प्लॅनिंग करुन प्रतिस्पर्ध्याचा व नडणाऱ्याचा गेम वाजवत आहे.