वेणेगाव : पहाटेचा तो क्षण, शांत वातावरण. मंद वारा आणि नव्या दिवसाची सुरुवात. पण रामकृष्णनगरमध्ये हीच पहाट एका कुटुंबासाठी कायमची काळरात्र ठरली. या एका पहाटेने ‘संस्कृती’ या काळाच्या पडद्याआड गेल्या अन् पती विजय यांची आयुष्यभराची साथ कायमची हिरावून घेतली गेली.
संस्कृती विजय वाघमारे अवघे 21 वर्षांचे वय. आयुष्याची स्वप्ने अजून फुलतही नव्हती, संसाराला अवघे दीड वर्षच झाले होते. दररोजप्रमाणे त्या दिवशीही त्या आपल्या पतीसोबत मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या होत्या. कदाचित दोघेही भविष्यातील योजना बोलत असतील, छोट्या-छोट्या आनंदाच्या गोष्टी शेअर करत असतील पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. ध्रुव पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर अचानक भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने क्षणार्धात सर्व काही संपवून टाकले. एका भीषण अपघातात संस्कृती यांचा जागीच मृत्यू झाला आणि पती विजय यांच्या डोळ्यांसमोर त्यांचा संसार अक्षरशः कोसळला.
पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात पाहत असताना त्यांच्या मनावर काय बेतलं असेल, याची कल्पनाही करवत नाही. काही क्षणांपूर्वी हातात हात घालून चालणारे हे दोघे आणि पुढच्या क्षणी कायमची ताटातूट ही वेदना शब्दात मावणारी नाही. गावभर हळहळ पसरली आहे. एका निष्पाप, हसऱ्या चेहऱ्याचे जाणे त्या कुटुंबावर आघात करणारे असून भरलेल्या आयुष्याचा असा अंत झाल्याने प्रत्येकजण हेलावून गेला आहे. संस्कृतींच्या मृत्यूने एक मोठा प्रश्न समोर आणला आहे, आपले रस्ते खरंच सुरक्षित आहेत का? ही घटना केवळ दुःखद नाही, तर आपल्याला सावध करणारीही आहे. पहाटे किंवा रात्री चालताना काही साध्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या तर अशा दुर्घटना टाळता येऊ शकतात.
एका निष्पाप जीवाची किंमत फक्त एका क्षणाच्या बेफिकीरीने मोजावी लागली. आज संस्कृती नाहीत, त्यांच्या जाण्याने अवघं कुटुंब दु:ख सागरात बुडाले आहे. या घटनेने मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांनाही काही सूचक इशारा दिला गेला आहे.