सातारा : दीपाली पाचांगणे या आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून ती हत्या आहे. गेल्या 2 महिन्यांपासून पाठपुरावा केला जात असताना फलटण, सातारा पोलिसांकडून सहकार्य होत नाही. तसेच दीपालीचा शवविच्छेदन अहवाल डॉ. संपदा मुंडे यांनी तयार केला असून त्यांच्याकडून जबरदस्तीने, दबावातून चुकीचा अहवाल केला गेला असल्याचा आरोप पाचांगणे कुटुंबीयांनी सातार्यात केला. दरम्यान, शवविच्छेदन अहवाल बदलण्याचे हे रॅकेट होते का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
दिपाली पाचांगणे यांची आई भाग्यश्री पाचांगणे व वडील मारुती पाचांगणे यांनी याबाबतचे धक्कादायक आरोप केले आहेत. भाग्यश्री पाचांगणे यांनी सांगितलेली करुण कहानी अशी, दिपालीला त्यांनी बी.टेक ई अॅन्ड टीसी पर्यंतचे शिक्षण दिले. तिचा विवाह 20 नोव्हेंबर 2021 रोजी अजिंक्य निंबाळकर (रा. वाठार निंबाळकर ता.फलटण) यांच्याशी झाला. अजिंक्य इंडियन आर्मीमध्ये नोकरीला आहेत. विवाह झाल्यापासूनच सासरच्या मंडळींनी दिपालीचा सतत मानसिक व शारीरीक छळ केला. दिपालीला अनेकदा मारहाण झाली. वेगवेगळ्या पध्दतीने तिच्यावर दडपण आणले गेल्याने ती नैराश्यात गेली होती. दिपालीला दीड वर्षाची मुलगी आहे. दि. 17 ऑगस्ट 2025 रोजी दिपालीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याच फलटण ग्रामीण पोलिसांनी आम्हाला सांगितल. पोटच्या पोरीचा मृत्यू झाल्याचे समजताच पाचांगणे कुटुंब हतबल झाले.
मात्र, दिपालीच्या आई भाग्यश्री यांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मुलीच्या मृत्यूनंतर पाच दिवस पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल दिला नव्हता. आता असे लक्षात आले आहे की, या शवविच्छेदन अहवालावर सही करणार्या महिला डॉक्टर संपदा मुंडे आहेत. त्यांनी नुकतीच आत्महत्या केली आहे. ‘माझ्या मुलीच्या प्रकरणात राजकीय दबाव आणि पोलिसांच्या संगनमताने सत्य दडपल गेलं. डॉ. संपदा मुंडे यांच्यावर चुकीचा अहवाल तयार करण्यासाठी दबाव होता,’ असा आरोप केला. डॉ.संपदा यांच्यावर पोलिस व राजकारण्यांनी दबाव टाकले असल्याचे नुकतेच समोर आले आहे. आमच्या मुलीच्या बाबतीतही हाच प्रकार झाला आहे.
दिपालीने आत्महत्या केल्याचे प्रकरण रंगवून संशयित आरोपींवर जुजबी कारवाई केली. मूळ हत्येचे प्रकरण असताना निंबाळकर कुटुंबिय, पोलिस व राजकारण्यांनी आत्महत्या केल्याचे चुकीचे रंगवण्यात आले. दरम्यान, या आमच्या संपूर्ण प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरु करावी व आमच्या मुलीला न्याय मिळावा, अशी मागणी पाचांगणे दाम्पत्याने अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.वैशाली कडूकर यांच्याकडे केली आहे.
या प्रकरणाचा तपास फलटण ग्रामीण पोलिसांनीच केला आहे. आमचा या संपूर्ण तपासावर आक्षेप आहे. मुलीचा शवविच्छेदन अहवाल पूर्णपणे खोटा आहे. अनेक बाबींची शंका असताना त्याचे निरसन करण्यात आले नाही. वास्तविक दीपालीचा गळा आवळून खून झाला आहे. घरातील सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी सासरच्या मंडळींनी मृतदेह रुग्णालयात नेला. वास्तविक अगोदर पोलिसांना माहिती देऊन मग गळफास काढायला पाहिजे होता. मात्र तसे झाले नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
दीपालीच्या मृत्यूनंतर दुसर्या दिवसांपासून आम्ही पाठपुरावा करून सत्य तपास व्हावा, अशी मागणी केली. मात्र, पोलिसांनी गळफासाचे प्रकरण तयार करून दीपालीच्या सासरच्या मंडळींवर कठोर कारवाई केली नाही. यामुळे पुन्हा त्या प्रकरणाची चौकशी व्हावी.मारुती पाचांगणे