सातारा : सातारा शहर परिसरात दोन ठिकाणी पोलिसांसमोरच अक्षरश: राडेबाजी झाली. पहिल्या घटनेत सातारा जिल्हा न्यायालयाच्या कँटीनलगत मोकळ्या जागेत दोन टोळ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. दुसर्या घटनेत गोडोली नाका येथे चौघांनी राडा करत दंगा केला. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही प्रकरणांत 9 जणांवर गुन्हे दाखल केले.
पहिल्या प्रकरणात अमीर मुजावर, आमीर शेख, आबू भिसे (तिघे रा. पिरवाडी, ता. सातारा), सागर सपकाळ (रा. अंबदरे रोड, शाहूपुरी), देवेंद्र ढोणे (रा. ढोणे कॉलनी, सातारा) या पाचजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सहायक फौजदार शंकर चव्हाण यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
अधिक माहिती अशी, पहिली घटना दि. 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. संशयित पाचजण न्यायालयात कामानिमित्त गेले होते. ते न्यायालयातील कॅन्टीनलगत मोकळ्या जागेत एकमेकांसमोर आले. यावेळी दोन्ही गटात जुन्या वादातून तू तू मैं मैं ला झाली. वाद विकोपाला गेल्यानंतर संशयित एकमेकांच्या अंगावर धावून गेले. न्यायालयातच दोन टोळी भिडल्यानंतर आरडाओरडा झाल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलिसांसमोरच संशयित एकमेकांच्या अंगावर धावून जात होते.
दुसर्या प्रकरणात योगेश विलास काळंगे (वय 44, रा.शुक्रवार पेठ, सातारा), श्रीधर अनिल निकम (वय 32, रा. देगाव रोड, सातारा), ज्ञानेश्वर विलास मोरे (वय 38, रा. बोरखळ ता.सातारा), धनंजय वामन अनपट (वय 38, रा. अनपटवाडी ता.कोरेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस अश्विनी बच्चाव यांनी तक्रार दिली आहे.
अधिक माहिती अशी, ही घटना दि. 1 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री घडली. गोडोली नाका येथील एका हॉटेलसमोर संशयित चौघेजण भांडत होते. शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतरही त्यांचा कालवा सुरु राहिला. यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
कोर्टाबाहेर रस्त्यावर लूटमार
सातारा जिल्हा न्यायालयात राडा झाल्यानंतर देवेंद्र ढोणे व त्याचा मित्र सागर मानसिंग सपकाळ (वय 41, रा. अंबेदरे रोड, शाहूपुरी) हे न्यायालयाबाहेर आले. यावेळी संशयित आबू भिसे याच्यासह त्याच्या अनोळखी 4 साथीदारांनी सागर सपकाळ याला कोर्टाबाहेर रस्त्यावर गाठून मारहाण केली. ‘तुला लय मस्ती आली आहे,’ असे म्हणत दमदाटी, शिवीगाळ करत संशयितांनी तक्रारदाराच्या खिशातील 3,200 रुपये चोरून नेले. ही तक्रार स्वतंत्र दाखल करण्यात आली आहे.