उंब्रज : कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उंब्रज पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेल्या दोन संशयितांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. दोन्ही संशयितांवर पेरले परिसरात कारवाई करण्यात आली असून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गणेश बाळासाहेब कांबळे (वय 29) व अभय जनार्दन चव्हाण (वय 21, दोघे रा. पेरले, ता. कराड) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत उंब्रज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रेकार्डवरील दोन संशयित पेरले परिसरात आले असल्याची माहिती उंब्रज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रविंद्र भोरे यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र भोरे यांनी दोन स्वतंत्र पथके तयार करून छापा टाकला. यावेळी दोन्ही संशयितांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. संशयितांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांच्यासह पोलिस हवालदार संजय धुमाळ, विकास शिंदे, राजू कोळी, श्रीधर माने, महिला पोलीस शिपाई भगत यांनी केली आहे. हवालदार युवराज पवार तपास करीत आहेत.