सातारा : सातारा शहर पोलिसांनी कुख्यात गुन्हेगाराकडून एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली. निकेत वसंत पाटणकर (वय 32, रा. चंदननगर, कोडोली) असे संशयिताचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
संशयित निकेत पाटणकर याच्या विरुद्ध सातारा जिल्ह्यात खंडणी, जबरी चोरी, मारामारी, हाफ मर्डर, मोक्का व आर्म अॅक्ट असे सुमारे 16 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. सराईत गुंड पाटणकर याला दोन वर्षासाठी तडीपारदेखील केले होते. दरम्यान, तो सातारा शहर परिसरातील एमआयडीसी परिसरातील हॉटेल व्यावसायिकांकडून खंडणी मागत होता. खंडणी न दिल्याने एका हॉटेलची त्याने तोडफोड केली. या गुन्ह्यानंतर तो पसार झाला होता. यामुळे त्याची दहशत निर्माण झाली होती. गुन्हा घडल्यापासून तो तीन महिने पसार होता.
संशयित निकेत पाटणकर हा सोमवारी रात्री उशिरा सातारा शहर परिसरातील जानाई मळाईच्या पायथ्याला येणार असल्याचे पोलिसांना समजले. तो स्वतःजवळ गावठी पिस्टल बाळगून असल्याबाबतची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. यामुळे त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा लावला होता. पोलिसांनी त्याला पाहिल्यानंतर ताब्यात घेतले असता, त्याच्या कमरेला एक गावठी पिस्टल व दोन जिवंत राऊंड मिळून आले.
पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, पोनि राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शामराव काळे, फौजदार सुधीर मोरे, पोलिस सुजित भौसले, नीलेश जाधव, नीलेश यादव, विक्रम माने, पंकज मोहिते, सुशांत कदम, तुषार भोसले, सचिन रिटे, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुहास कदम यांनी कारवाईत सहभाग घेतला.