महाबळेश्वर : महाबळेश्वर-मेढा मुख्य रस्त्यावर माचुतर गावाच्या हद्दीत शनिवारी दुपारी झालेल्या एसटी व दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. महाबळेश्वरहून साताऱ्याकडे जाणाऱ्या राजमाता जिजाऊ एसटी बस आणि समोरून येणाऱ्या दुचाकीची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. नरेश रमेश भोंडेकर (वय ४५, रा. टेकवली, ता. महाबळेश्वर) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नरेश भोंडेकर दुचाकी (एमएच ११ एव्ही २०८८) वरून महाबळेश्वरकडे येत असताना महाबळेश्वरहून साताऱ्याकडे निघालेल्या राजमाता जिजाऊ एसटी बस (एमएच १४ एनई ४२२५) ची समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी गंभीर जखमी अवस्थेतील नरेश भोंडेकर यांना तातडीने महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
हा अपघात शनिवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास घडला. मृत नरेश भोंडेकर यांचे महाबळेश्वर एसटी बसस्थानकाच्या मागील बाजूस, हॉटेल ड्रीमलँडसमोर मोबाईल रिपेरिंगचे छोटे दुकान असून ते नेहमीप्रमाणे दुकानाकडे जात असताना हा दुर्दैवी अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नरेश भोंडेकर हे सर्वसामान्य कुटुंबातील असून त्यांच्या पश्चात पत्नी, दोन वर्षांची मुलगी आणि चार वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.