आष्टा : सासवड-जेजुरी रस्त्यावरील भोंगळे मळा येथे वारकऱ्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या आणखी एका वारकरी महिलेचे उपचारादरम्यान निधन झाले. शांता शिवाप्पा अलकोपर (वय ७०, रा. मिरजवाडी, ता. वाळवा) असे मृत महिलेचे नाव आहे. या अपघातातील मृतांची संख्या आता पाच झाली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी त्या कसबे डिग्रज येथील दिंडीसोबत आळंदीहून पंढरपूरकडे निघाल्या होत्या. सासवड-जेजुरी मार्गावर दिंडीत ट्रक घुसल्याने झालेल्या अपघातात शांता अलकोपर या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. अलकोपर यांच्या निधनाचे वृत्त समजताच मिरजवाडी गावावर शोककळा पसरली. वारकरी संप्रदायातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. मिरजवाडी येथे सोमवारी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.