विठ्ठल हेंद्रे
सातारा : साताऱ्याच्या गुन्हेगारीच्या रक्तरंजित वास्तवामध्ये अनैतिकतेच्या रॅकेटचाही मोठा बाजार भरत आहे. कॉलेजसह टुक्कार पोरांना कॅफेचा, गुंड प्रवृत्तींना लॉजचा तर हायप्रोफाईल भानगडबाजांसाठी फार्महाऊसचा खुल्लमखुल्ला पर्याय मिळत आहे. सातारा, पाचगणीत तर डान्सबारप्रमाणे छमछमाट सुरू असल्याच्या पोलिस केसेस गेल्या 10 वर्षांपासून दाखल होत आहेत. लपूनछपून सुरू असलेला हा सर्व मामला कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? असा सवाल उपस्थित झाला आहे.
साताऱ्याच्या गुन्हेगारीमध्ये सर्व पद्धतीच्या क्राईमचा शिरकाव झाला आहे. गेल्या 10 वर्षांत ही परिस्थिती अधिक बोकाळली असून दुर्दैवाने त्यावर कठोर कारवाई होत नाही. सातारा शहरासह जिल्ह्यात कॅफेत धडधडीत नंगानाच सुरू आहे. शेकडो कॅफेंवर पोलिसांकडूनच गुन्हे दाखल झाले आहेत. संपूर्ण ठिकाणी सीसीटीव्ही असावा, काळ्या काचा नसाव्यात असे नियम असताना कॅफे चालक या नियमांना फाट्यावर मारत आहेत. शाळा, कॉलेजमधील मुलं या कॅफे कुसंस्कृतीला बळी पडत आहेत. लॉजच्या बाबतीत देखील अशीच परिस्थिती आहे.
शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात लॉज थाटण्याचे प्रमाण वाढले आहे. अल्पवयीन मुला-मुलींना तिथे प्रवेश दिला जावू नये, असा नियम आहे. मात्र लॉज चालकांकडून ओळखपत्र, वय पाहिले जात नाही. 500 रुपये अधिकचे मिळाले की लॉजमध्ये सहज प्रवेश मिळतोय. पोक्सोचा गुन्हा दाखल झाला की मग हॉटेल, लॉजचे नाव त्यामुळे समोर येते. तोपर्यंत तेरी भी चूप मेरी भी चूप असा मामला राहतो. छमछमसाठी सातारा, पाचगणी खुशकीचे ठिकाण असा पॅटर्नच बनू लागला आहे. यातूनही पोलिस वर्षातून एक-दोन छमछमाट सुरू असलेल्या ठिकाणी छापे टाकतात. यामध्ये हायप्रोफाईल उद्योजक, व्यावसायिक सापडून बदनाम होत आहेत. मात्र पुरवापुरवीची यंत्रणा भानगडबाज, गुंडांकडून होत असल्याचेही वास्तव आहे. साताऱ्यात बॉम्बे रेस्टॉरंटजवळ बारक्या पोरांनी व गुंडांनी कट रचून टोळीयुद्धातून एकाचा खून केला होता. पोलिस तपासामध्ये संशयितांनी इन्स्टाग्रामवरुन प्रतिस्पर्धी गुंडाला मुलीच्या नावे फेक अकाऊंट काढून तिथे बोलावून घेऊन भरदिवसा गोळ्या घालून खतम केल्याची घटना घडली आहे. (क्रमश:)
गुंडांसाठी सेफ हाऊस...
मुंबई, पुणे तसेच स्थानिक पातळीवर काहीतरी कांड केले की या गुंडांना, भानगडबाजांना साताऱ्यातील फार्म हाऊस ही सेफ हाऊस ठरत आहेत. साताऱ्यातील दुर्गम भागात मोबाईलला रेंज नसते. फिल्डींग लावून गेले की अगदी एक महिन्यांपर्यंत याच फार्म हाऊसवर सर्व सोय होत आहे. दारू, जेवणासह निसर्गाच्या सान्निध्यात गुन्हेगारांची लपाछपी खुलेआम होत आहे.
गुंड रचत आहेत हनी ट्रॅप...
साताऱ्यात गेल्या 4 वर्षांपासून हनी ट्रॅपच्या घटना कमालीच्या वाढल्या आहेत. पैसेेवाला बघून मुली, महिला सोडून जाळ्यात अडकवले जात आहे. मुळात अशा घटना घडूनही समोर येत नाहीत. तसेच गुन्हे दाखल झाले तर तपासातही या बाबी दुर्दैवाने समोर येत नाहीत. मुळातच हनी ट्रॅप लावले ही आणखी एका नव्या गुन्हेगारीचे भीषण रूप असून, ते साताऱ्यासारख्या ठिकाणीही वाढू लागले आहे.