म्हसवड; पुढारी वृत्तसेवा : पर्यंती (ता. माण) येथे माय-लेकीचा गळा आवळून निर्घृण खून केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. या घटनेने माण तालुका हादरला असून, घटनेमागचे नेमके कारण समोर आलेले नाही. संपताबाई लक्ष्मण नरळे (वय 75) व नंदाबाई भिकू आटपाडकर (58, दोघी राहणार पर्यंती, ता. माण) अशी माय-लेकीची नावे आहेत.
घटनास्थळ व म्हसवड पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, संपताबाई व नंदाबाई या माय-लेकी एकत्र राहत होत्या. त्यांचे गावातच एक छोटे किराणा दुकान आहे. दोघीही विधवा असून गावातील सर्वांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. संपताबाई यांना तीन मुली व दोन मुले आहेत. एक मुलगा पुण्यात नोकरी करत असून एक पर्यंती गावातच वेगळा राहून शेती करत आहे. त्यांची मुलगी नंदाबाई यांना मुलबाळ नसून दोन सावत्र मुले आहेत. ते घरापासून काही अंतरावर रहात आहेत. गुरुवार दि. 21 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता नंदाबाई यांची नात भारती दाजीराम नरळे ही किराणा दुकानात सामान घेण्यासाठी आली असता तिला दुकानाचे शटर थोडे उघडे दिसले. तीने आजीला हाक मारली. परंतु कोणीच आवाज देत नसल्याने तिने घराचे दार ढकलले. यावेळी दोघी मायालेकी समोरच मृतावस्थेत पडलेल्या दिसून आल्या. ही घटना तिने कुटुंबियांना सांगून याची माहिती म्हसवड पोलिसांना दिली. सपोनि शिवाजी विभुते यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.