सातारा

सातारा: प्रेमी युगुलास पळून जाण्यास मदत केल्यावरून खून

दिनेश चोरगे

कराड; पुढारी वृत्तसेवा : प्रेम प्रकरणातून प्रेमी युगुलास पळून जाण्यास मदत केल्याच्या कारणावरून चिडून मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या भावासह आई-वडिलांना तसेच मदत करणार्‍यास लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी दहा जणांवर गुन्हा नोंद केला असून, तिघांना अटक केली आहे. राजमाची (ता. कराड) गावच्या हद्दीत सोमवार (दि. 30) रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जनार्दन महादेव गुरव (वय 49, रा. राजमाची, ता. कराड) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर शेखर ऊर्फ उदय भीमराव पवार, बाबासाहेब भीमराव पवार, गौरव बाबासाहेब पवार (तिघेही रा. हजारमाची, ता. कराड) व बाबासाहेब पवार यांचा सैदापूर येथील पाहुणा (पूर्ण नाव माहित नाही) तसेच त्यांच्यासोबत असलेले अनोळखी सहाजण असे एकूण दहा जणांवर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यापैकी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. प्रमोद विश्वास पवार यांनी याबाबतची फिर्याद शहर पोलिसात दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, राजमाची गावच्या हद्दीत प्रमोद विश्वास पवार यांना त्यांच्या घरासमोर संशयितांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. यावेळी त्यांची आई नंदा पवार तेथे आल्यानंतर त्यांनाही मारहाण करून जखमी केले. त्यानंतर संशयितांनी प्रमोद पवार यांना जबरदस्तीने कराड-विटा रस्त्याकडेला असलेल्या दादासाहेब मोकाशी कॉलेजच्या गेटजवळ जानाई मंदिरासमोरील मोकळ्या जागेत सुर्ली घाटाजवळ नेले. तेथे दुसरी एक चारचाकी गाडी अगोदरच उभी होती. त्यामध्ये विश्वास पवार व जनार्दन गुरव होते. संशयितांनी प्रमोद पवार यांचा भाऊ प्रवीण विश्वास पवार यांनी प्रेम संबंधातून आपल्या मुलीस पळवून नेले आहे, असे समजून त्यांच्याकडे विचारपूस करत दमदाटी केली. तसेच प्रवीण व मुलगी कुठे आहेत असे विचारले. मात्र कोणतीही माहिती मिळत नसल्याच्या कारणावरून चिडून संशयितांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून प्रवीण पवार, वडील विश्वास पवार यांना जखमी केले.

त्यानंतर संशयितांनी प्रवीण पवार कोठे आहे? तुला माहित आहे? तू मदत केली आहेस? अशी विचारणा जनार्दन गुरव यांच्याकडे केली. त्यावेळी गुरव यांनी मी त्यांना पळून जाण्यास मदत केली नाही. प्रवीण कोठे आहे मला माहित नाही, असे सांगितले. त्यामुळे संशयितांनी जनार्दन गुरव यांना गाडीतून खाली ओढून दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीमध्ये जनार्दन गुरव हे बेशुद्ध पडले. त्यानंतर संशयितांनी प्रमोद पवार व विश्वास पवार यांना सुर्ली घाटातील निर्जनस्थळी नेऊन पुन्हा मारहाण केली. तेथून त्यांना राजमाची येथील घराजवळ सोडले. तिघेही जखमी असल्याने ते उपचारासाठी कराड येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये आले. त्यानंतर जनार्दन गुरव यांना मयत अवस्थेत अनोळखी व्यक्तींनी कृष्णा हॉस्पिटल येथे आणून स्ट्रेचरवर सोडून निघून गेल्याचे समजले.

याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा नोंद केला आहे. त्यापैकी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या संशयितांना न्यायालयात हजर केले असता सहा नोव्हेंबरपर्यंत दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान इतर संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT