Satara Crime News : संधिवाताचं औषध घेऊन आला अन् घर रिकाम करुन गेला! File Photo
सातारा

Satara Crime News : संधिवाताचं औषध घेऊन आला अन् घर रिकाम करुन गेला!

कातवडी बुद्रुक येथील घटना : सोन्याच्या ऐवजासह रोख रक्कम लांबवली

पुढारी वृत्तसेवा

परळी : ‘जेजुरी इथून आलोय संधिवात जुनी दुखणी तत्काळ घालवतो’, असे सांगून दोघा अज्ञातांनी कातवडी बुद्रुक येथील एका महिलेकडून सोन्याचा ऐवज व रोख रक्कम असा सुमारे 2 लाखांना गंड्डा घातला. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कातवडी बुद्रुक येथील लक्ष्मी रामचंद्र लोटेकर यांच्या घरी रविवारी चारचाकी गाडीतून (स्विफ्ट डिझायर) दोन व्यक्ती आल्या. त्यांनी आम्ही संधिवाताचे औषध देतो असे सांगत त्यांच्या जवळचे व्हिजिटिंग कार्ड दिले. थोड्यावेळ गप्पा मारत माहिती घेत त्यांनी देव्हार्‍यापर्यंत जाऊन तुम्हाला देवाचा कोप आहे असे सांगत यासाठी काही उपाय करावे लागतील, असे म्हणत लक्ष्मी लोटेकर यांना देव्हार्‍याजवळ बसवले. यावेळी त्यांनी घरातील सोने, रोख रक्कम देव्हार्‍याजवळ ठेवून पूजन करायला सांगितले. लक्ष्मी लोटेकर यांनीही ते सांगतील त्या पद्धतीने दोन अंगठ्या, चेन काढून देव्हार्‍या जवळ ठेवली.

तसेच जवळची सुमारे 24 हजार रुपयाची रोख रक्कम त्यांनी पूजन करायला ठेवली. पूजन झाल्यावर नमस्कार करत असताना त्या दोन व्यक्तींनी त्यांच्या अंगावर अंगारा (पावडर) टाकली. ते अंगावर पडताच त्या काही वेळ तशाच बेशुद्ध झाल्या. काही वेळाने शुद्ध आली असता संशयित गाडी सुरू करून निघत होते. यावेळी त्यांनी शेजारील मुलाला त्यांचा एक फोटो घ्यायला सांगितला. त्यावेळी त्यांचे पती राखी बांधायला वडगावला गेले होते. दुपारी ते घरी आल्यावर त्यांनी मला बरे वाटत नाही असे सांगून तशाच बसून राहिल्या. त्यांचे पती रामचंद्र यांनीही बरे वाटत नसावे म्हणून थोडा वेळ थांबून आपली जनावरे शेतात घेऊन गेले. रात्री उशिरा सर्व प्रकार त्यांनी पतीला सांगितला.

दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांचे पती रामचंद्र यांनी संशयितांनी दिलेल्या नंबरवर फोन केला. त्यावेळी त्यांनी मी उद्या येतोय असे सांगितले. तो दिवस घालवला. मात्र दुसर्‍या दिवशीही ते आले नाहीत. उलट संबंधित व्यक्तींनी फोन बंद करून ठेवला. यानंतर त्यांनी आपण फसलो आहोत. मात्र कुठे वाच्यता केली तर आपली मुंबई येथील मुले तसेच ग्रामस्थ आपल्यालाच वेड्यात काढतील. यामुळे त्यांनी गावातही कुठे वाच्यता केली नाही. बुधवारी त्यांनी दिलेल्या पत्त्यावर जाण्याचा निर्णय घेतला. तसेच ही घटना त्यांनी कातवडी सरपंच दीपक देवरे यांना सांगितली. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची कल्पना देत त्यांना पोलीस स्टेशनला नेले. याबाबतची तक्रार तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी परळी येथून सीसीटीव्ही फुटेज मिळवले असून संबंधित चोरट्यांची गाडी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अधिक तपास सपोनि विनोद नेवसे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT