Drug Racket File Photo
सातारा

Satara Crime : खंडाळा तालुक्याचा ‘उडता पंजाब’ करताय का?

एमडी ड्रग्‍जच्‍या रॅकेटने तरुणाई उदध्‍वस्‍त होण्‍याच्‍या मार्गावर : पोलिसांच्‍या भूमिकेवर संशय

पुढारी वृत्तसेवा

शशिकांत जाधव

लोणंद : खंडाळा तालुक्यात एमडी ड्रग्जसह विविध अंमली पदार्थांच्या वाढत्या वापरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शिरवळ, केसुर्डी, खंडाळा एमआयडीसी परिसरासह अनेक भागांत ड्रग्जचे जाळे पसरत चालले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही शंका उपस्‍थित केली जात आहे. अवघ्‍या १५ दिवसांच्‍या कालावधीत दोन वेळा ड्रग्‍जच्‍या कारवाया झाल्‍याने खळबळ उडाली आहे. त्‍यामुळे भविष्‍यात खंडाळ्‍याची अवस्‍था ‘उडता पंजाब’ होवू नये, यासाठी लोकप्रतिनिधी आणि पोलिसांनी कठोर भूमिका घेणे आवश्‍यक आहे. अन्‍यथा तरूणाई उध्‍दवस्‍त होण्‍यास वेळ लागणार नाही

अवघ्या पंधरा दिवसांत दोन ड्रग्जविरोधी कारवाया झाल्या असल्या तरी त्या केवळ काही आरोपींपुरत्याच मर्यादित राहिल्याची चर्चा आहे. ड्रग्ज रॅकेटचे मुख्य सूत्रधार अद्याप पोलिसांच्या हाती लागत नसल्याने हे संपूर्ण नेटवर्क कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे का? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील हिंजवडी पोलिसांनी केलेल्या कारवाईत खंडाळा तालुक्याशी ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे जोडले गेल्याची माहिती समोर आली होती. बाहेरील पोलिसांना हे रॅकेट सापडते, मात्र स्थानिक खंडाळा आणि शिरवळ पोलिसांना त्याची कल्पना कशी नव्हती, याबाबत नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. शिरवळ पोलीस ठाण्यात अंमली पदार्थांच्या विक्री व सेवनाबाबत अनेक वेळा तक्रारी करण्‍यात आल्‍या. मात्र, त्यानंतरही व्यापक धाडसत्र, संशयितांची चौकशी किंवा मुख्य पुरवठादारांपर्यंत पोहोचणारी कारवाई झालेलीच नाही. त्यामुळे पोलिसांचचे ड्रग्‍ज माफियांशी साटेलोटे आहे का? असा सवाल केला जात आहे.

खंडाळा तालुक्यातील वाढते औद्योगिकरण आणि त्याचबरोबर निर्माण होणाऱ्या एम. डी ड्रग्‍जसारखी अंमली सेवन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सेवन करणाऱ्या तरुणांची संख्या वाढत असल्याने त्यांना पुरवठा करणारे हातही पुढे येऊ लागले आहेत. त्यामुळेच ड्रग्जचे रॅकेट खंडाळा तालुक्यामध्ये फोपावले जावू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी या रॅकेटचा पर्दाफाश पुणे पोलिसांनी केला होता. त्यानंतरही खंडाळा तालुक्यात एमडी ड्रग्स रॅकेट सुरूच असल्याचे बोलले जात आहे. या रॅकेटला आळा घालण्यात पोलीस संपूर्णपणे अयशस्वी झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

सोशल मीडियावर विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि स्थानिक नेते जाहीरपणे ड्रग्ज माफियांविरोधात आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मात्र, या आरोपांची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याबाबत पोलीस यंत्रणा पुरेशी सक्रिय दिसत नाही. ड्रग्ज माफियांचे संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी मोठी मोहीम राबवली जाणार का, की कारवाई केवळ काही आरोपींपुरतीच मर्यादित राहणार? तसेच, या अवैध व्यवसायाला नेमके कोणाचे संरक्षण आहे, याचाही शोध घेण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT