पुसेसावळी : राजाचे कुर्ले (ता. खटाव) येथील झीरो पॉईंट परिसरात १२ सप्टेंबर रोजी आढळलेल्या अनोळखी महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवून खुनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि औंध पोलिसांना यश आले. तब्बल १२ दिवस विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच सातारा, सांगली, सोलापूर आणि कर्नाटक सीमावर्ती भागात तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी खुनाचा उलगडा केला. चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा डोक्यात खोरे घालून खून केल्याची कबुली संशयित पतीने दिली आहे. पोलिसांनी संशयिताला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. ३० सप्टेंबर पर्यंत पोलिसकोठडी सुनावली आहे.
मनीषा राहुल कोळी (वय ४०) असे खून झालेल्या पतनीचे नाव असून राहुल संभाजी कोळी (वय ४०, दोघे रा. मांडवे ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे संशयित पतीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी साडेनऊ वाजण्यापूर्वी राजाचे कुर्ले गावच्या हद्दीतील झीरो पॉईंट येथे संग्राम संभाजी माने यांच्या शेतालगत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी औंध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी प्रथम मृत महिलेची ओळख पटवून पुढील तपास करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके आणि औंध पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली.
मृत महिलेची घटनास्थळी कोणतीही ओळख पटत नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. तपास पथकांनी घटनास्थळ तसेच संभाव्य मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. एका सीसीटीव्हीमध्ये आढळलेल्या हालचालींचा दुसऱ्या ठिकाणच्या फुटेजशी संबंध जोडत पोलिसांनी महिलेच्या हालचालींचा मागोवा घेतला. तब्बल १२ दिवस अहोरात्र विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.
तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या बारकाईने केलेल्या अभ्यासातून पोलिसांना एका वाहनाचा क्रमांक मिळाला. या क्रमांकावरून वाहनमालकाचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी माळशिरस तालुक्यातील मांडवे येथे जाऊन संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान पत्नीचा चारित्र्यावर संशय घेऊन तिला राजाचे कुर्ले येथे आणून खून केल्याची कबुली संशयित पतीने दिली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि विश्वजीत घोडके, औंध पोलिस ठाण्याचे सपोनि सुनील जानकर यांच्यासह दोन्ही पथकांतील अधिकारी व अंमलदारांनी केली.