सातारा : शाळा, कॉलेजच्या बाहेरील टपरीवर मिळणाऱ्या बांटा गोळ्या खायच्या, फटाका गाड्या फायरिंग करत उडवायच्या, गांजाच्या अड्ड्यावर जायचे, गांजा फुकायचा आणि हातात कोयते नाचवत डोक्यात हिशेब घोळवत गांजाडी गँग साताऱ्यात उच्छाद मांडत आहे. राजकीय नेत्यांचे, पोलिस दलातील खावगाबऱ्या कॉन्स्टेबलचे वरदहस्त डोक्यावर असल्याने सुपाऱ्या वाजवत समस्त साताऱ्याला वेठीस धरणारी ही टोळी आता धरून चोपायची वेळ आली आहे. फूक गांजा.. घे कोयता अन् घाल डोक्यात असा पॅटर्न बनला असून क्राईम करण्यासाठी बाल गुन्हेगारीचा बिनधोकपणे वापर केला जात आहे. या गांजाड्यांना आता कायमचा उतारा हवा.
सातारा जिल्ह्यात गेल्या 3 वर्षांत गांजा शेतीचे पीक जोमाने सुरू असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीत 3 वर्षांत गांजाचे 44 गुन्हे दाखल झालेले आहेत. यामध्ये 1068 किलो वजानाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. गांजाव्यतिरिक्त इतर नशेली ड्रग्ज, नशेची इंजेक्शनची संख्या वेगळीच आहे. साताऱ्यात या सर्व प्रकारची नशा प्रामुख्याने एमआयडीसी परिसर, अगडळीची ठिकाणे, अजिंक्यताराचा पायथा, चारभिंती परिसर, महाविद्यालय परिसर, यवतेश्वर घाट येथे बिनधोकपणे केली जात आहे. पोलिसांकडून अशा ठिकाणी अपवादात्मक वेळीच कारवाई होत आहे. या कारवाईनंतर गांजा, ड्रग्ज कुठून आणला, हे पोलिस कारवाईत गुलदस्त्यात राहत आहे.
राजकीय नेत्यांचे हस्तक असलेली ही टवार गँग बांटा गोळ्या खाऊन माजली आहे. पोलिस दलाचे टिपर होण्याऐवजी असल्या भिकार चाळे करणाऱ्या फुटकळ गुंडांचे टिपर होऊन पोलिस काम करत आहेत. सातारा शहर, सातारा तालुका, एलसीबीच्या टीममधले अनेकजण असल्या फुटकळदादांचे वाढदिवस साजरे करायला गल्ली-बोळात फिरत असतात. गुंडांच्या व्हॉटसअप स्टेटसवर व इन्स्टा स्टोरींवर हे पोलिस दादा सिंघम म्हणून मिरवत असतात तर कधी कधी या कॉन्स्टेबल लोकांच्या स्टेटसवरही गुंडांचे वाढदिवस होत असतात एवढे लागेबांधे आतून रूजले आहेत.
शाळा, महाविद्यालयात जाण्याऐवजी तिथल्या टपरींवर बांटा गोळ्या घेवून नशेत तर्र होणारी ही गिधाडं पोलिसांना दिसत नाहीत. पोलिसांच्या समोर त्यांना दम मारत फायरिंग वाजवत ही मिसरूड फुटलेली पोरं आख्खा सातारा हलवत आहेत. रात्री-अपरात्री नागरी वस्तीशेजारी यांचे अड्डे जमत आहेत. मोठमोठ्या नेत्यांची कारटीही त्यात सामील असतात. त्यामुळे संपूर्ण साताऱ्याची शांतता नाहीशी झाली आहे. जिल्हा पोलिस प्रमुखांनी संपूर्ण पोलिस दलाची झाडाझडती घेण्याची गरज आहे. ॲक्चुल पोलिसिंग करणारे धाडसी कर्मचारी साताऱ्यात आणायला हवेत. गुंडा-पुडांचे हस्तक असणारे, राजकीय नेत्यांचे टिपर म्हणून वावरणारे सोशल मीडियावर हिरोगिरी करणारे बाजूला ठेवून खऱ्या पोलिसांची साताऱ्यात गरज आहे. त्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुखांनी स्वत: मैदानावर उतरण्याची गरज आहे.
पोलिस सोशल मिडीयावर वॉच ठेवणार का?
सातारा पोलिसांनी खरच सोशल मीडिया तपासला, तर बहुतांश गुन्हेगारांची माहिती व त्यांचे उद्योग समजतील. यासाठी पोलिसांनी स्वत:हून काही बाबी करायला पाहिजेत. लवकर फेमस होण्यासाठी इन्स्टाग्रामसह इतर सोशल मीडिया गुन्हेगारांचा अड्डा बनला आहे. भाई, दादा, डॉन अशी बिरुदावली लावून हातात शस्त्रे घेऊन रिल्सचा पाऊस पाडला जात आहे. यामुळे सातारा पोलिसांनी सोशल मीडियावर वॉच ठेवल्यास भविष्यात डोकेदुखी ठरणाऱ्या गुन्हेगारांवर आवर घातला जाऊ शकतो.
साताऱ्याला घेरले जातेय..
गुन्हेगारीच्या विळख्यात सातारा अक्षरश: घेरला जात आहे. नशेच्या बांटा गोळ्या या तर पानटपरीसारख्या ठिकाणी मिळत आहेत. अनेक ठिकाणी ड्रग्जचे वितरण होत असून नशेडी लोक त्याठिकाणी जाऊन दम मारो दम करत झिंगत आहेत. ड्रग्जची इंजेक्शनदेखील साताऱ्यात मिळत असल्याचा नुकताच पर्दाफाशदेखील झाला आहे. एकदा कारवाई झाली की, काही दिवस चिडीचूप होते; मात्र चार दिवसांत पुन्हा जोमाने नशेचा व्यापार सुरू होत आहे.