pudhari photo
सातारा

Satara Crime: दुधेबावीमध्ये पिस्तूलसह चौघे गजाआड

फलटण ग्रामीण पोलिसांची कारवाई : सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

फलटण : फलटण ग्रामीण पोलिसांनी दुधेबावी परिसरात राबवलेल्या धाडसी कारवाईत दोन गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतूस, पल्सर दुचाकी आणि मोबाईल फोनसह सुमारे २ लाख ५० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत चाैघांना अटक केली. या कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.

प्रतीक प्रमोद खुंटे (वय २५, रा. मांडकी, ता. पुरंदर, जि. पुणे), प्रदीप ऊर्फ सोन्या संतोष गोरे (२१, रा. काळुबाईनगर, साखरवाडी, ता. फलटण), करण कानिफ घोलप (रा. मंगळवार पेठ, फलटण) व समीर ऊर्फ वर्धन बाळासो खवळे (२२, रा. मांडवखडक, ता. फलटण) अशी संशयितांची नावे आहेत.

फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोनि राजकुमार भुजबळ यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रतीक खुंटे हा त्याच्या साथीदारासह गावठी पिस्तूल घेऊन दुधेबावी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून गुन्हे प्रकटीकरण पथकाने दुधेबावी परिसरात सापळा रचला. दरम्यान, संशयित पल्सर मोटारसायकलवरून जात असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. फलटण-दहिवडी मार्गावर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रतीक खुंटे व प्रदीप गोरे यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान प्रतीक खुंटे याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले.

पोलिसांनी चौकशीची सूत्रे वेगाने फिरवत तपासाची व्याप्ती वाढवली असता, आणखी एक गावठी पिस्तूल करण घोलप याला विकल्याचे निष्पन्न झाले. या व्यवहारात समीर खवळे याचीही भूमिका समोर आली. त्यानुसार पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत दुसरे गावठी पिस्तूल जप्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT