सातारा : स्वतःच्या १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पित्याला सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विजय आनंदराव खताळ (वय ३५, रा. हिवरे, ता. कोरेगाव) असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला जन्मठेप व तीन हजार रुपये दंड तसेच सात वर्षे सक्तमजुरी व ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
आरोपी विजय खताळ याने आपल्याला कर्करोग झाला असून आपण मरणार असल्याने आपल्या मुलाचे पुढे हाल होतील, या विचारातून मुलाला मुक्ती देण्याच्या उद्देशाने २३ डिसेंबर २०२३ रोजी दोरीने मुलगा विक्रम ऊर्फ प्रणव याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह स्वतःच्या उसाच्या शेतात पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सपोनि एस. बी. भोसले यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. तांबोळी यांच्या न्यायालयात खटला चालला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता एम. कुलकर्णी आणि तत्कालीन जिल्हा सरकारी अभियोक्ता श्रीमती लकडे यांनी काम पाहिले. खटल्यात १५ साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, कोरेगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी आणि वाठार पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मेळावणे यांनी कामकाज पाहिले.