Pudhari News Network
सातारा

Satara Crime: वंजारवाडीत कर्जाच्या व्याजातून शेतकऱ्याची जमीन, घर हडपले

सावकारीप्रकरणी एकावर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

सातारा : व्याजाने घेतलेल्या एक लाख रुपयांच्या कर्जावरून कळंबीतील एका 75 वर्षीय शेतकऱ्याची जमीन, घर आणि अन्य मालमत्ता जबरदस्तीने विकायला लावल्याचा आणि धमक्या दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. सावकारकीप्रकरणी औंध पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

उदय आनंदराव माळवे (रा. लक्ष्मीनगर, वंजारवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत कळंबी येथील बाबासो गणपती सुतार (वय 75) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाबासो सुतार यांनी दि. 10 ऑगस्ट 2015 रोजी उदय माळवे याच्याकडून 1 लाख रुपये 10 टक्के मासिक व्याजाने घेतले होते. सुरुवातीला सहा-सात महिने व्याजाची रक्कम दिली असली तरी नंतर परतफेड करता आली नाही. त्यानंतर सन 2017 मध्ये बँक ऑफ इंडियातून सात लाख रुपयांचे कर्ज घेऊन त्यांनी सुमारे तीन लाख रुपये व्याज व मुद्दल परत केले.

उर्वरित रक्कम वसूल करण्यासाठी उदय माळवे यांनी सुतार यांना कळंबी येथील गट नं. 176, 177, 178 मधील दीड एकर जमीन जबरदस्तीने विकायला लावली. त्या विक्रीतून मिळालेल्या पैशांतील चार लाख रुपये माळवे यांनी घेतले. त्याचबरोबर सुतार यांचे राहते घर उदय माळवे यांच्या आईच्या नावावर खरेदी खत करून घेतले. तसेच दुसरे घर 10 ऑक्टोबर 2017 रोजी नोटरी तारण गहाण म्हणून माळवे यांच्या नावावर करून घेतले होते. नंतर दि. 28 जून 2018 रोजी सात लाख पन्नास हजार रुपये रोख घेऊन ती तारण नोटरी रद्द केली आहे.

त्याचबरोबर सुतार यांनी बंधन बँक व किनारा कॅपिटल बँक, कराड येथून कर्ज घेऊन देखील माळवे यांना चार लाख रुपये परत दिले आहेत. तरीदेखील उदय माळवे यांनी अजून पैसे बाकी असल्याचे सांगत वारंवार दमदाटी व धमक्या दिल्या असल्याचेही सुतार यांनी तक्रारीत म्हटले आहे. या गुन्ह्याची नोंद औंध पोलिस ठाण्यात झाली असून तपास एन. के. कांबळे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT