सातारा

Satara Crime : डोळ्यांत चटणीची पूड टाकून युवतीचा खून?

राजेवाडी हद्दीत झुडपात टाकला मृतदेह; घातपाताचा संशय

पुढारी वृत्तसेवा

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील राजेवाडी गावच्या हद्दीत शिदेंवाडी-भोर महामार्गालगत एका शेताच्या बाजूला असलेल्या झुडपामध्ये २५ ते ३० वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित युवतीच्या डोळ्यांत चटणीची पूड टाकल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आल्याने तिचा घातपात केला असण्याची शक्यता शिरवळ पोलिसांनी व्यक्त केली आहे. मृत युवतीची ओळख अद्याप पटलेली नसून, तिची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शिंदेवाडी-भोर रस्त्यावर राजेवाडी (ता.खंडाळा) गावच्या हद्दीत एका शेतालगतच्या झुडपामध्ये युवतीचा मृतदेह असल्याची माहिती शिरवळ पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोनि महेश इंगळे, सपोनि महादेव शिद, कीर्ती म्हस्के, सहायक पोलिस उपनिरीक्षक शशिकांत भगत यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. तसेच सातारा येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि शिरवळ रेस्क्यू टीमलाही घटनास्थळी पाचारण केले.

रेस्क्यू टीमच्या मदतीने झुडपातून मृतदेह बाहेर काढला. यावेळी संबंधित युवतीच्या डोळ्यांत चटणीची पूड टाकल्याचे आढळून आले. मृत युवतीचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असल्याचे प्राथमिक पाहणीत निष्पन्न झाले आहे. तिची ओळख पटलेली नसल्याने पोलिसांकडून परिसरातील तसेच इतर ठिकाणच्या बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी तपासण्याचे काम सुरू आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फलटण येथील फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण केले. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे व नमुने तपासण्याची कार्यवाही केली. युवतीचा मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्रात रवाना केला आहे. या घटनेमागे नेमके कारण काय, युवतीची ओळख काय आहे आणि तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

प्राथमिक परिस्थितीवरून घातपाताची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांकडून विविध बाजूंनी तपास केला जात आहे. मृत युवतीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून नागरिकांना आवाहन केले आहे. या युवतीबाबत कोणाला काही माहिती असल्यास अथवा तिची ओळख पटत असल्यास शिरवळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT