file photo
सातारा

Satara Crime | मुलीच्या नावे चॅटिंग : खंडणीची मागणी

तिघांना अटक; वीर धरण परिसरात बोलावून युवकाला लुटले

पुढारी वृत्तसेवा

शिरवळ : सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधत 35 वर्षीय तरुणाला हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढून ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत खंडणी मागणाऱ्या तिघांना शिरवळ पोलिसांनी अवघ्या एक तासात अटक केली. यामध्ये कथित यूट्यूबर व मनसेच्या तालुकाध्यक्षाचा समावेश आहे. याप्रकरणी तिघांवर शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे खंडाळ्यात खळबळ उडाली आहे.

यूट्यूबर किरण प्रकाश मोरे (मूळ रा. कर्नावड, ता. भोर, जि. पुणे, सध्या रा. शिरवळ, ता. खंडाळा), सातारा जिल्ह्यातून तडीपार असलेला विशाल महादेव जाधव, मनसेचा तालुकाध्यक्ष इरफान दिलावर शेख (दोघे रा. शिरवळ, ता. खंडाळा) असे जेरबंद केलेल्या संशयितांची नावे आहेत.

फलटण तालुक्यातील 35 वर्षीय युवकाशी इन्स्टाग्रामवर महिलेच्या नावाने संपर्क साधत चॅटिंग करण्यात आले. यानंतर संबधित युवकाला संपर्क साधत त्याला भादे गावातील वीर धरण परिसरात बोलवण्यात आले. यावेळी दोन दुचाकीवरुन आलेल्या किरण मोरे व विशाल जाधव यांनी संबंधित युवकाला कारमध्ये घुसून काठी व हाताने बेदम मारहाण केली. त अपहरण करण्याचाही संशयितांनी प्रयत्न केला. या घटनेबाबत कोणाला काही सांगितल्यास ॲट्रॉसिटी, विनयभंगांचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. शिवाय महिलेशी चॅटिंग केल्याचा संदर्भ देत किरण मोरे याच्या नावावर गाडी करून देण्यासाठी धमकावले.

या घटनेनंतर संबधित युवकाने शिरवळ पोलिस ठाणे गाठत गुन्हा दाखल केला. पोनि यशवंत नलावडे यांनी पोलिसांची पथके तयार केली आणि अवघ्या एका तासात तिन्ही संशयितांना अटक केली. पोलिसांनी संशयितांना न्यायालयाने दि. 12 नोव्हेंबरपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या संशयितांविरोधात कोणाची काही तक्रार असल्यास निर्भिडपणे पुढे येवून तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोनि यशवंत नलावडे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT