वडूज : वडूज पंचायत समितीच्या गोदामाजवळ झाडीत आढळलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटली असून, तो परप्रांतीय मजूर रजनीकांत व्यंकप्पा वडियार (वय २६, मूळ रा. ताडकल, गुलबर्गा, कर्नाटक; सध्या रा. वडूज) याचा असल्याचे स्पष्ट झाले भाऊ लक्ष्मीकांत वडियार याने दारूच्या नशेत झालेल्या भांडणातून रजनीकांतचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिल्याची माहिती समोर आली आहे.
रजनीकांतच्या छातीवर धारदार हत्याराने वार करून खून केल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले. डीवायएसपी कार्यालयाच्या परिसरानजीक मृतदेह टाकल्याने या प्रकरणाचा तपास करण्याचे आव्हान वडूज पोलिसांसमोर होते. रजनीकांत व भाऊ लक्ष्मीकांत हे गवंडी काम करत होते. लक्ष्मीकांतची पत्नी पल्लवी हिने सुमारे दीड वर्षापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येला रजनीकांत कारणीभूत असल्याचा संशय लक्ष्मीकांतला होता. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे समोर आले. गेल्या आठवड्यात कातरखटाव शिवारातील एका विहिरीजवळ दोघे दारू पिण्यासाठी बसले असताना त्यांच्यात पुन्हा वाद झाला.
यावेळी लक्ष्मीकांतने दगडाने रजनीकांतच्या डोक्यात व शरीरावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर भावाला वडूजला आणले; मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन रजनीकांतची प्रकृती गंभीर झाल्याने लक्ष्मीकांत घाबरला. त्याने पंचायत समितीच्या गोदामाजवळील झाडीत भावाचा मृतदेह टाकून तेथून निघून गेल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. चार दिवसांनंतर बेवारस मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली असताना लक्ष्मीकांत मात्र तेथे दिसून आला नाही. तसेच त्यांच्या आईकडून दोन्ही भावांमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती मिळाली. यावरून पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासाची दिशा निश्चित करत लक्ष्मीकांतला ताब्यात घेतले.
एकट्याचे काम की साथीदार?
लक्ष्मीकांतने एकट्याने खून केला की त्याला आणखी कोणाची साथ होती, याचा तपास सुरू आहे. कातरखटाव ते वडूज हे सुमारे आठ किलोमीटरचे अंतर मृतदेह घेऊन पार करताना कोणत्या वाहनाचा वापर केला, तसेच शासकीय आवाराजवळच मृतदेह टाकण्यामागील नेमका हेतू काय होता, याचाही छडा लावणे आवश्यक आहे.