सातारा : सातारा शहरात निकृष्ट व भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या विक्रीबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम राबवली. या कारवाईत सुमारे १ लाख ८७ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून, तीन आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच एका आस्थापनेला २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करून तक्रारींची निष्पक्ष व कायदेशीर पद्धतीने पडताळणी करण्याची मागणी अन्न व औषध प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यानंतर सहाय्यक आयुक्त (अन्न), सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी चव्हाण व खापणे यांच्या पथकाने विशेष तपासणी मोहीम राबवली.
प्रशासनाने कारवाई अहवालानुसार, तपासणीदरम्यान खाद्यतेल व खवा जप्त करण्यात आला. काही आस्थापनांमध्ये त्रुटी आढळल्याने त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर एका आस्थापनेवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. याशिवाय विविध खाद्यपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.
शहरासह परिसरात भेसळखोरांनी उच्छाद मांडला असून याबाबत तक्रारी आल्या होत्या. त्यावर शाहनिशा करून मनसेच्यावतीने अन्न व औषध प्रशासनाला निवेदन देण्यात आले. त्यावर प्रशासनाने काही ठिकाणी धाडी मारल्या. त्यात त्यांनी सुमारे १ लाख ८७ हजार रुपयांचा माल जप्त करत तीन आस्थापनांचे परवाने निलंबित केले. तसेच एकाला २० हजार रुपयांचा दंड केला आहे.- राहुल पवार, मनसे सातारा शहराध्यक्ष