सातारा : करंजे येथे बुधवारी सायंकाळी गॅरेज चालकावर झालेल्या कोयता हल्ला प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. जमिनीच्या वादातून सुपारी देऊन हे कृत्य करण्यात आले आहे. संशयित टोळी पुणे येथील असून याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात उंबरकर गँगचाही उल्लेख झाला आहे.
अजित जालिंदर गाडे (रा. कोंडवे ता. सातारा), सूरज उंबरकर, सागर उंबरकर (दोघेही रा. मोळाचा ओढा), प्रज्वल यादव, अथर्व सुतार, दिंगबर वाघमारे (सर्व रा. कात्रज, पुणे) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अक्षय रामदास गाडे (वय 30, रा. कोंडवे, ता. सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
बुधवारी सायंकाळी संशयित टोळक्याने अक्षय गाडे यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला चढवला. वादावादी, हाणामारी होऊन कोयत्याने दहशत माजवली जात असताना नागरिक तेथे जमा झाले. नागरिकांची गर्दी पाहून संशयित पळाले. या झटापटीत एका संशयिताला नागरिकांनी पकडले. सुमारे 15 मिनिटे हाणामारीचा थरार सुरू होता. यामुळे परिसरात पळापळ, भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर शाहूपुरी पोलिस घटनास्थळी गेल्यानंतर तणाव निवळला.
दरम्यान, अक्षय गाडे यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हल्ल्याचे प्राथमिक कारण समोर आले. तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचा चुलत भाऊ अजित गाडे याच्याशी जुना हायवे ते कोंडवे रोडवर असलेल्या जमिनीबाबत वाद सुरु आहे. यातूनच अजित गाडे याने उंबरकर गँगला जीवे मारण्यासाठी सुपारी दिली. जीवे मारण्याचा कट रचूनच प्रज्वल यादव याने कोयत्याने वार केला.