मसूर : ग्रामपंचायत दप्तरी नोंद असलेल्या हद्दीतील रस्त्यावर बेकायदेशीर सुरू असलेल्या बांधकामाबाबत न्यायालयाने स्थगिती आदेश देऊनही शिवाजी भगवान मुळीक यांच्यासह अन्य दोघांनी बळजबरीने बांधकाम सुरू ठेवून न्यायालयीन स्थगिती आदेशाचा भंग केला आहे, असा आरोप किवळ ता.कराड येथील अमोल तानाजी मुळीक यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
मुळीक म्हणाले, किवळ येथे आबासाहेब थोरात यांचे घर ते खडकबाईची विहीर असा रस्ता असून सदर पंधरा फूट रुंदीच्या रस्त्याची नोंद ग्रामपंचायत नमुना नंबर 23 ला आहे. सदर रस्ता तयार झाल्याचा सातारा समाज कल्याण विभागासाठी केलेला ग्रामपंचायत ठराव तसेच मासिक सभा दि. 26 सप्टेंबर 1995 च्या ठराव क्रमांक 8 नुसार याची ग्रामपंचायत दप्तरी नोंद आहे.
तसेच त्या रस्त्यावर ठिकठिकाणी काँक्रीट केलेले आहे. त्याच रस्त्यावर शिवाजी भगवान मुळीक, राहुल लालासो मुळीक व विक्रम लालासो मुळीक यांनी अतिक्रमण करून बांधकाम सुरू ठेवले आहे. याप्रकरणी दि. 29 फेब्रुवारी 2024 रोजी ग्रामपंचायत ग्रामसेवक व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना अर्ज दिला होता. सदर अर्जावर पंचायत समितीने नोटीस काढली. मात्र तरीही संबंधितांनी सदर रस्त्यावर बेकायदेशीर बांधकाम सुरू ठेवले. या प्रकरणी आपण कराड दिवाणी कोर्टात केस दाखल करून दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी रस्त्यावरील बेकायदेशीर बांधकामास स्थगिती दिली. तरीही वरील इसमानी बळजबरीने बांधकाम सुरूच ठेवून रहदारीचा रस्ता बंद केला आहे.
मुळीक पुढे म्हणाले, शिवाजी मुळीक यांच्यासह दोघांनी रस्त्यावर घर बांधण्यासाठी पाया काढल्यापासून ते स्लॅब पडेपर्यंत बेकायदेशीर बांधकाम सुरू ठेवल्याबाबत आपण वरिष्ठांना पुराव्यानिशी पाठपुरावा केला. जिल्हा परिषद, पंचायत समिती यांनाही कळविण्यात आले आहे. तरीही त्याची कोणी दखल घेतली नाही.सदर बाब पुराव्यानिशी कोर्टाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे मुळीक यांनी सांगितले.
या प्रकारणाची चौकशी केली असता तक्रारीत नमुद असलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने न्यायालयाच्या आदेशानुसार खडकबाईची विहीर ते आबासाहेब थोरात यांच्या घरापर्यंत असणार्या रस्त्यावर संबंधितांनी कोणत्याही प्रकारचे बांधकाम करु नये असे निर्देशित करण्यात आले आहे.- गटविकास अधिकारी, पंचायत समिती कराड.