सातारा : अमेरिका, इस्त्राईल-इराण युध्द, आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींच्या झळा आता सर्वसामान्यांपर्यंत पोहचू लागल्या आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा कमी होत असून घरगुती गॅस उपलब्ध असतानाही अफवांमुळे टंचाईची धास्ती नागरिकांमध्ये वाढल्याने अवघा जिल्हा गॅसवर आला आहे. त्याचा सर्वात जास्त फटका हॉटेल, खानावळ व खाद्यपदार्थ व्यवसायिकांना बसत आहे. नोंदणी व गॅस सिलिंडर घेण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच गॅस एजन्सीजमध्ये ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. तसेच सिलिंडर मिळवण्यासाठी वितरकांशी वादावादी होत आहे. युद्ध आखातात सुरु असले तरी त्याच्या झळा जिल्ह्यात बसत आहेत.
पूर्वी दारात तुळशी वृंदावन अन् स्वयंपाकघरात वैलासह सारवलेली रेखीव चूल हे संस्कारांचे दर्शन घडत असे. पण आधुनिकतेचे वारे वाहू लागल्याने ग्रामीण भागातही सिमेंट काँक्रीटच्या टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे चकाचक घरात गॅस शेगडीचा वापर वाढून स्वयंपाकघरातील चूल आऊट हाऊस, शेडच्या कोनाड्यात आली. तर काहींनी घरांच्या मागच्या बाजूला, शेजारी आपली संस्कृती तसेच आणीबाणीच्या वेळी, यात्रा-जत्रांच्या स्वयंपाकासाठी अद्यापही चूलीचा कोपरा शिल्लक आहे. गॅस दर वाढ होवून टंचाईच्या झळा बसू लागल्याने चुलीवरच्या स्वयंपाकाची गोडी वाढली आहे. गाव-खेड्यामध्ये अनेक कुटुंबांमध्ये चुली पेटू लागल्या असून एकवेळचे जेवण चुलीवर केले जावू लागले आहे.
बुकींग होईना... गाडीवाला सिलिंडर देईना..
सतारा शहर, उपनगरासह ग्रामीण भागातही विविध गॅस एजन्सीजकडून वाहनाद्वारे गॅस सिलिंडरची घरपोच सेवा देण्यात येते. गॅस सिलिंडर वितरण करणाऱ्या वाहनासोबत एजन्सीचा कर्मचारी बुकींग केलेल्या ग्राहकांना गॅस सिलिंडर दिला जातो. मात्र मागील आठवड्यापासून मागणी वाढल्याने बुकींग यंत्रणेवर ताण येवून ती वारंवार ठप्प होत आहे. ऑनलाईन बुकींगशिवाय ओटीपी मिळत नाही. यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना एजन्सीत येवून पहा असे सिलिंडर पुरवठा वाहनधारकांकडून सांगण्यात येत आहे. एजन्सीमध्ये आल्यावर परस्पर बुकींग करुन सिलिंडर विक्रीचा काळाबाजार केल्यामुळे दोन सिलिंडर पुरवठ्यामधील कालावधीचा घोळ समोर येत आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसत असून बुकींग होईना अन् गाडीवाला सिलिंडर देईना, अशी बिकट अवस्था भाबड्या ग्राहकांची होत आहे.
खानावळचालकांपुढील अडचणी वाढ...
आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर व्यापारी वर्गाकडून सर्वसामान्यांना वेटीस धरले जात आहे. इराण-इस्त्राईल युद्धाचे कारण देत भुसार मालाच्या किंमतीमध्ये वाढ केली जात आहे.
घाऊक बाजारातील दर स्थिर असतानाही किरकोळ विक्रीत आर्थिक लूट केली जात आहे. त्याचा फटका खानावळ चालकांना बसत आहे. किराणा मालाच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने वाढलेल्या संकटात गॅसटंचाईची भर पडत आहे. शहरीभागात चूल तसेच लाकूड फाटा उपलब्ध होत नसल्याने या व्यावसायिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
त्यामुळे जेवणाच्या ताटालादेखील महागाईची फोडणी बसत आहे. त्यामुळे शिक्षणासाठी सातारा शहरात राहणारे विद्यार्थी, नोकरदार यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
कार्यालय मालकांपुढे अडचणी वाढल्या.. मेनूकार्डमध्ये बदल..
लग्नसराई हंगाम सुरु असल्याने सर्वत्र लग्नसोहळ्यांची धामधूम सुरु आहे. वऱ्हाडी मंडळींना लग्नसोहळ्यातील जेवण आवडले किंवा नाही तर त्याची चर्चा सर्वत्र होते. स्वादिष्ट व विविध पक्वानांचा थाट लग्नकार्यात पहायला मिळतो. परंतू व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा थांबल्याने लग्नसोहळ्यातील जेवणावर होणार आहे. लाखो रुपये खर्चून उभारलेल्या चकाचक इमारत लाकडी भट्टीमुळे काळवंडणार असल्याने चूल किंवा लाकडावर स्वयंपाकाला परवानगी देणे अशक्य होत आहे. बाहेरुन तयार जेवण आणणे व वाढत्या इधन खर्चाच्या पार्श्वभूमीवर यजमानांना तडजोड करावी लागणार आहे. त्यामुळे यापूर्वी दिलेल्या मेनूकार्डमध्ये बदल करण्यात येत आहेत. ज्या कार्यालय परिसरात मोकळी जागा उपलब्ध आहे, तिथे चुलीवर स्वयंपाकासाठी परवानगी दिली जाणार आहे.
कुठे कोळशाच्या भट्ट्या धगधगल्या तर कुठे इंडक्शनचा वापर
आधुनिक सोयीसुविधांमुळे हॉटेल, रेस्टॉरंटमधील जुन्या कोळशाच्या भट्ट्याचा वापर मर्यादित राहिला होता. पण आता व्यावसायिक सिलेंडरच उपलब्ध नसल्याने हॉटेल व्यवसाय पूर्ववत सुरु ठेवण्यासाठी कर्मचारी व व्यवस्थापनाचा लवाजामा सांभाळण्यासाठी या हॉटेल, धाब्यांवर कोळश्याच्या भट्ट्या पुन्हा धगधगू लागल्या आहेत. चहा टपऱ्यांवर इंडक्शनचा वापर होत आहे. चहाचे पाणी इंडक्शनवर गरम करुन चहाच्या पातेल्यात ओतून चहा तयार केला जात आहे. मर्यादित गॅसचा वापर करत टंचाईवर मात केली जात आहे. मात्र भांडवली खर्चाचा आकडा फुगल्याने खाद्यपदार्थांचे दर वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे.