सातारा : तासगाव (ता. सातारा) येथे वरद शिवप्रसाद देशपांडे (वय 16, रा. कोडोली) या कॉलेज युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना दि. 10 मार्च रोजी दुपारी घडली आहे. सातारा तालुका पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे.
वरद हा फार्मसी कॉलेजमध्ये अकरावीचे शिक्षण घेत आहे. मंगळवारी दुपारी कॉलेज सुटल्यानंतर मित्रांसोबत तो विहिरीत पोहण्यासाठी गेला. त्याला पोहता येत होते. विहिरीत पोहत असताना तळातील गाळ काढण्यासाठी तो खाली गेला मात्र वर आला नाही. या घटनेने मित्र घाबरले. प्राथमिक माहितीनुसार वरद याच्या मित्रांनी लगेच विहिरीत उड्या मारल्या. पाण्यामध्ये मोटरीलगत तो पाईपमध्ये अडकला होता. मित्रांनी वरद याला त्यातून सोडवून वर काढले; मात्र वरद कोणताही प्रतिसाद देत नव्हता. रुग्णालयात त्याला दाखल केले असता, त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सातारा तालुका पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला व पोलिस ठाण्यात याची नोंद केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.