Satara civil hospital File Photo
सातारा

Satara Civil Hospital: सिव्हिलचे सुरक्षारक्षक 2 महिने बिनपगारी

ठेकेदार बदलूनही परिस्थिती ‌‘जैसे थे‌’ : अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

सातारा : आधी शासकीय अनुदानाचा प्रश्न आणि आता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सहीची प्रतिक्षा अशा कात्रीत जिल्हा शासकीय रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांचे पगार गेल्या दोन महिन्यांपासून रखडले आहेत. त्यामुळे 15 सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबावर ऐन लग्नसराई, सण व यात्रांच्या काळात उपासमारीची वेळ आली आहे.

जिल्हा रुग्णालयातील विविध कामाचे खासगीकरण करण्याकडे शासनाचा कल आहे. त्यातील एक महत्त्वाचे पद सुरक्षा रक्षकांचे आहे. या रुग्णालयात येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचे नियमन, रुग्णालयातील पार्किंग व परिसराच्या सुरक्षेमध्ये सुरक्षा रक्षकांचे काम महत्त्वाचे असते. बऱ्याचदा रुग्णालयात वादाचे प्रसंगही निर्माण होतात, अशा वेळी तसेच रुग्णांना आराम मिळण्यासाठी नातेवाईकांना वेळ संपल्यानंतर बाहेर काढण्याचे कामही सुरक्षा रक्षक करतात. सध्या सातारा सुरक्षारक्षक मंडळाच्या माध्यमातून ठेका पद्धतीने जिल्हा रुग्णालयात 15 सुरक्षारक्षक नेमण्यात आलेत. त्यात चार महिलांचाही समावेश आहे.

रोजगाराच्या संधीअभावी तुटपुंज्या पगारात हे सुरक्षा रक्षक काम करत आहेत. मात्र, त्यांना पगार वेळेत न मिळण्याच्या प्रसंगाचा वारंवार सामना करावा लागत आहे. अनेक महिन्यांत यांना पगार वेळेत हातात मिळत नाही. त्यामुळे त्यांनी संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी शासन व संबंधित संस्थेकडे पाठपुरावा केला होता. गेले दोन महिने या सुरक्षा रक्षकांना वेतन मिळालेले नाही. या दोनही महिन्यांचा काळ हा लग्नसराई, सण व यात्रांचा काळ होता. या काळात लोकांना पैशाची जास्त आवश्यकता असते.

मात्र, एक रुपयाही वेतन न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. तुटपुंज्या पगारात आधीच तारेवरची कसरत करत कुटुंब चालविणाऱ्या या सुरक्षा रक्षकांकडे ना शासनाचे ना प्रशासनाचे लक्ष आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT