Bribe Case Pudhari
सातारा

Satara civil hospital bribe case: ‘सिव्हिल‌’मधला शिपाई जाळ्यात

‘एसीबी‌’ने 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

पुढारी वृत्तसेवा

सातारा : क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांच्या केबिनबाहेरील शिपायाला 50 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. आनंदा गोपाळ वाळवेकर (वय 58, रा. सोनगाव, ता. सातारा) असे लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या शिपायाचे नाव आहे.

या प्रकरणातील तक्रारदारांचे हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी सेंटर, सरकारमान्य गर्भपात केंद्र, कुटुंब नियोजन केंद्र या सुविधा चालू करण्यासाठी आवश्यक असणारे परवाने मिळण्याकरिता जिल्हा रुग्णालयात प्रकरण दाखल केले होते. हे प्रकरण तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्याकडे प्रलंबित होते. त्यावेळी तक्रारदार हे डॉ. करपे यांच्या केबिनबाहेरील शिपाई आनंदा वाळवेकर यांना भेटले असता त्यांनी डॉ. करपे यांच्याकरिता 50 हजार रुपयांची मागणी केली होती.

दरम्यान, या तक्रारीच्या अनुषंगाने दि. 9, 10, 13, 16, 25, 30 मार्च 2026 तसेच 1 व 15 एप्रिल 2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पडताळणी कारवाई करण्यात आली. दि. 16 मार्च रोजी पडताळणी कारवाईत शिपाई आनंदा वाळवेकर याने पंचांसमक्ष लाचेची मागणी केली. त्यानंतर दि. 17 एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा रुग्णालयात सापळा रचला. त्यावेळी आनंदा वाळवेकर याला तक्रारदार यांना हॉस्पिटलसाठी लागणारे प्रमाणपत्र देऊन त्यांच्याकडून 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

‌‘एसीबी‌’चे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक राजेश वाघमारे, पोलिस निरीक्षक सुप्रिया गावडे, पोलिस निरीक्षक सुनील पाटील, हवालदार गणेश ताटे, नीलेश राजपुरे, सत्यम थोरात, नवनाथ शिंदे, महेश पुजारी यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT