Satara civil hospital File Photo
सातारा

Satara civil hospital mismanagement: जिल्ह्यात मंत्री चार; सिव्हिलमध्ये मात्र स्वैराचार

जिल्हा शल्यचिकित्सक व स्त्रीरोग तज्ञ निलंबनानंतर मिळेना कायमस्वरूपी कारभारी

पुढारी वृत्तसेवा
विशाल गुजर

सातारा : जिल्हा रुग्णालयाची ओळख आरोग्य मंदिर म्हणून आहे. या रुग्णालयाला ग्रहण लागले असून अर्भक मृत्यू प्रकरणात बुधवारी दि. 1 एप्रिल रोजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे व स्त्रीरोग तज्ञ डॉ. चाँदसाहेब शिकलगार या दोघांचे निलंबन झाले. तेव्हापासून अद्याप सीएसचा पदभार कोणाकडे देण्यात आलेला नाही. तसेच अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, निवासी जिल्हा शल्यचिकित्सक व प्रशासकीय अधिकारीही प्रभारीच आहेत. जिल्ह्यात चार मंत्री असताना सिव्हिलमध्ये मात्र कारभाऱ्याअभावी स्वैराचार झाल्याची अवस्था आहे.

सातारा जिल्हा रुग्णालयात सातारा, सांगली, कोल्हापूर यासह इतर ठिकाणाहून दररोज 1000 ते 1100 रुग्ण उपचारासाठी येत असतात. जिल्हा रुग्णालयात सर्व सुविधा दर्जेदार चांगल्या असल्याने रुग्ण संख्या वाढत आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयातील भानगडीमुळे सिव्हील बदनाम झाले आहे. विजापूर येथील अल्पवयीन मुलीची प्रसुती अन थोड्या वेळात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अर्भकाचा मृत्यू आणि एका महिन्यात दोन वेळा मृतदेह अदलाबदल होण्याच्या घटना घडल्या.

अर्भक प्रकरण कोल्हापूर खंडपीठात गेल्याने बुधवार दि. 1 रोजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे व स्त्रीरोग तज्ञ डॉ. सी. एम. शिकलगार यांना निलंबित करण्यात आले. त्यांना निलंबित करण्यात आल्यापासून अद्याप त्यांची खुर्ची रिकामीच असून कोणाकडेही पदभार दिला गेला नाही. त्यातच अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक प्रभारी पदभार डॉ. राहुल जाधव यांच्याकडे दहा दिवसांपासून आहे. तसेच जिल्हा रुग्णालयाचे कार्यालयीन जबाबदारीही गेले दीड वर्षांपासून प्रभारी प्रशासकीय अधिकारी म्हणून डॉ. स्मिता लोंढे या पाहत आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक यांची खुर्ची रिकामी असल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. सध्या शाळा प्रवेश सुरु असल्याने वयाचे दाखले, वैद्यकीय बिले, अपंग रुग्णांचे दाखले.

नोकरीसाठी फिटनेस प्रमाणपत्र, मेडिकल खरेदी, लॅबोरेटरी साहित्य खरेदी, नवीन रुग्णालय नोंदणी किंवा तीन वर्षानंतर रिनिव्हेशन प्रमाणपत्र यासह अन्य कागदपत्रांवर सह्यांसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील असे चार मंत्री असताना सिव्हिलला चालक मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. पालकमंत्री देसाई यांच्या पक्षाचे आरोग्यमंत्री असून त्यांनी तरी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT