Satara Civil Hospital 
सातारा

Satara Civil Hospital: डॉक्टर पसार अन्‌‍ शिपाई जेलात

सिव्हीलची रुग्णसेवा व्हेंटीलेटरवर : असंवेदनशीलतेचा कळस

पुढारी वृत्तसेवा
विठ्ठल हेंद्रे

सातारा : गोर-गरीबांचे आरोग्य मंदिर म्हणून असलेली क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयाची (सिव्हील) ओळख पुसू लागली असून अर्भक मृत्यूप्रकरणात गुन्हा दाखल असलेला स्त्री रोग तज्ञ डॉ. सी. एम. शिकलगार पसार झाला आहे तर लाच प्रकरणातील शिपाई जेलात (कारागृहात) बसला आहे. यामुळे रुग्णसेवा व्हेंटीलेटरवर गेली असून असंवेदनशीलतेच्या या पाशातून सिव्हीलची कधी सुटका होणार? असा सवाल उपस्थित झाला आहे.

सिव्हीलच्या कारभाराचे अक्षरश: वाटोळे झाले आहे. महिनाभरात दोनदा मृतदेहांची अदलाबदल केल्याने तर राज्यात नाचक्की झाली. त्यातच अल्पवयीन मुलीची प्रसुती झाल्यानंतर निष्काळजीपणामुळे अर्भकाचा 12 तासांनी मृत्यू झाल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला. स्थानिक पातळीवर प्रशासनाकडे लढाईला दाद मिळत नसल्याने कुटुंबिय कोल्हापूर सर्कीट बेंचमध्ये गेले. न्यायालयाने सर्व प्रकरण वाचून, ऐकून संताप व्यक्त केला. याचा परिणाम थेट सिव्हील सर्जन व स्त्रीरोग तज्ञांना निलंबित केले.

अर्भक मृत्यू प्रकरणातच डॉ. सी. एम. शिकलगार यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गेले महिनाभर या प्रकरणाने सिव्हील प्रशासनाचे वाभाडे निघाले. मुळात मुलगी अल्पवयीन व तिची प्रसुती झाल्यानंतर अर्भकावरील उपचारात हयगय झाली. यामुळे सिव्हील प्रशासन किती असंवेदनशील बनले आहे, याचे जळजळीत वास्तव उपसंचालक यांनी दिलेल्या तक्रारीतच समोर आले आहे.

चार दिवसांपूर्वीच्या घटनेत सिव्हीलचा शिपाई आनंदा वाळवेकर चक्क 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना सापडला. यातील तक्रारदार डॉक्टरना त्यांच्या हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी सेंटर, सरकारमान्य गर्भपात केंद्र व कुटुंब नियोजन केंद्र याची परवानगी पाहिजे होती. त्यासाठी सर्व कागदपत्रेही सिव्हीलमध्ये दिली होती. मात्र शिपायाने त्या कामासाठी 50 हजाराची लाच 9 मार्च रोजी मागितली आणि ती घेताना एसीबीने ही कारवाई केली. एकीकडे उपचारातील हेळसांड आणि दुसरीकडे लाचखोरीचे हिमनग यामुळे सिव्हीलचा कारभार रामभरोसे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT