सातारा

Satara Civil Hospital : आरोग्य मंदिराभोवतीच घाणीचे साम्राज्य

सिव्हिलमध्ये स्वच्छतेचा बोजवारा : कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीने रुग्ण-नातेवाईक त्रस्त

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जिल्ह्यातील प्रमुख शासकीय रुग्णालय असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांना उपचार मिळतात; मात्र रुग्णालयाच्या परिसरातच स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. ठिकठिकाणी साचलेला कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या, कागद, पत्रावळी आणि टाकाऊ साहित्यामुळे परिसराला अक्षरशः घाणीचे स्वरूप आले आहे. त्यामुळे ‘आरोग्य मंदिरा’ भोवतीच घाणीचे साम्राज्य का? असा संतप्त सवाल रुग्ण, नातेवाईक आणि नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

रुग्णालयाच्या रस्त्यालगत तसेच संरक्षक भिंतीजवळ कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून डास-माशांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना या अस्वच्छ वातावरणाचा त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालय परिसराची नियमित स्वच्छता होते की केवळ कागदोपत्रीच स्वच्छता दाखवली जाते, असा प्रश्न या परिस्थितीमुळे निर्माण झाला आहे. रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत असतील, तर स्वच्छता यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे.

सिव्हील परिसरात वापरलेली इंजिक्शन, मास्क, हॅण्ड ग्लोज यासह वैद्यकीय कचरा अस्थाव्यस्थ पडल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे रुग्णांना आरोग्यसेवा देण्याचा दावा आणि दुसरीकडे रुग्णालयाच्या आवारातच घाणीचे ढीग, अशी विसंगत परिस्थिती आहे. रुग्णांनी उपचार घ्यायचे की अस्वच्छतेतून नवे आजार टाळायचे? असा सवाल नागरिक करत आहेत. ‘स्वच्छता हीच सेवा’चा नारा देताना सिव्हिलच्या आवारातील ही घाण प्रशासनाला दिसत नाही का? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून परिस्थिती सुधारली नाही, तर आंदोलन करण्याचा इशाराही सामाजिक संघटनांनी दिला आहे. आता सिव्हिलच्या या ‘घाणीच्या साम्राज्या’ला लगाम घालणार कोण? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा शल्य चिकित्सकांनी करावी पाहणी...

दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहुल जाधव यांनी या प्रकाराची तातडीने दखल घेऊन संपूर्ण रुग्णालय परिसराची पाहणी करावी आणि स्वच्छता व्यवस्थेचा आढावा घ्यावा, अशी मागणी सामाजिक संघटनांकडून होत आहे. केवळ कागदोपत्री स्वच्छता न दाखवता प्रत्यक्षात परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणेला जबाबदार धरावे, अशीही मागणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT