Satara civil hospital: सिव्हिलकडून मृतदेहांची अदलाबदल Pudhari
सातारा

Satara civil hospital: सिव्हिलकडून मृतदेहांची अदलाबदल

पेटती चिता विझवली : नातेवाईकांचा संताप; दोन कर्मचारी निलंबित

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील कारनाम्यांचा मंगळवारी अक्षरश: कहर झाला. दोन मृतदेहांची अदलाबदल झाली असून आरळेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू असताना हा प्रकार समोर आला. दुसऱ्याच कोणाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात होते. नेमक्या त्याचवेळी रुग्णालयातून फोनाफोनी झाली अन्‌‍ चितेवरील अर्धवट जळालेला मृतदेह पुन्हा बाजूला ठेवण्याची वेळ आली. या प्रकाराने नातेवाईकांच्या संतापाचा उद्रेक झाला. सिव्हिल हॉस्पिटलच्या बेफिकीर व हलगर्जीपणाचा कळस झाल्याने ही घटना घडली असून सिव्हिलच्या आवारातही तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, अर्धवट जळालेला मृतदेह स्वीकारण्यास नातेवाईकांनी नकार दिल्यामुळे रात्री उशिरापर्यंत तणाव कायम राहिला.

सुरेश मस्कू खोमणे (वय 51, रा. आरळे, ता. सातारा) व आनंद सुनील ओव्हाळ (वय 26, रा. वाई) असे सिव्हिलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झालेल्या व मृतांची अदलाबदल झालेल्यांची नावे आहेत. या दोघांनी वेगवेगळ्या घटनेत विषारी द्रव प्राशन केले होते. सोमवारी रात्री दोघांचाही उपचारावेळी मृत्यू झाला होता. कुटुंबीयांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हंबरडा फोडला. मंगळवारी सकाळी 8 च्या सुमारास मृतदेहांचे विच्छेदन झाले. दोन्ही कुटुंबीय शोकाकुल होते. यावेळी शवगृहातून मृतदेह दोन्ही कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.

वाईच्या आनंद ओव्हाळ या युवकाचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतल्यानंतर वाई येथे विधीला सुरुवात करण्यात आली. यावेळी संबंधित मृतदेहाबाबत उपस्थित सर्वांना शंका आली. वर्णनानुसार तो मृतदेह आनंद ओव्हाळ यांचा नसल्याचे लक्षात आले. यामुळे ओव्हाळ कुटुंबीयांनी सिव्हील रुग्णालयाशी संपर्क केला. दोन्ही मृतदेह अर्ध्या तासाच्या अंतराने नातेवाईकांना दिल्याने गफलत झाल्याचे लक्षात आले. यानंतर सिव्हिल प्रशासनाने आरळे येथील खोमणे कुटुंबीयांशी संपर्क साधला.

तोपर्यंत इकडे सुरेश खोमणे यांचा मृतदेह आहे, असे समजून त्यांच्या नातेवाईकांनी आरळे येथे स्मशानभूमीत विधिवत अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात केली होती. अग्नी दिल्यानंतर काही मिनिटांमध्येच सिव्हील रुग्णालयातून खोमणे कुटुंबीयांना फोन आला की संबंधित मृतदेह चुकीचा आहे. तोपर्यंत अग्नी दिला असल्याचे खोमणे कुटुंबीयांनी सांगताच तत्काळ तो विधी थांबवा, असे सांगण्यात आले. त्यानुसार खोमणे कुटुंबीयांनी विधिवत जळत असलेली चिता विझवली.

दुसरीकडे वाई येथील तो मृतदेह पुन्हा सिव्हिलमध्ये आणण्यात आला. तब्बल 9 तासांहून अधिक काळ ‌‘जैथे थे‌’ परिस्थिती राहिल्याने सिव्हिलच्या गलथान कारभारामुळे मृतदेहांची विटंबना झाली. संबंधितांवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा वाईतील ग्रामस्थांनी घेतला. दुसरीकडे आरळेकर त्यांचा मृतदेह मागत होते. मात्र, त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. जमाव पोलिस ठाण्यात देखील गेला होता. सातारा पोलिस व सिव्हिल प्रशासन हे प्रकरण हाताळण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे उघड झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT