वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत अधिकार्‍यांना सूचना करताना ना. शिवेंद्रराजे भोसले. Pudhari Photo
सातारा

Satara News | सातारा शहर ‘हरित’ करण्यासाठी विविध उपक्रम राबवणार : ना. शिवेंद्रराजे

वृक्षारोपणासह वृक्ष संवर्धनासाठी व्यापक मोहीम

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा शहरातील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण, सुधारणा व सुशोभीकरण करण्यात येत आहे. रस्ते रुंद होत असल्याने काही ठिकाणी वृक्षतोड अनिवार्य होत आहे. त्यामुळे शहरातील वृक्षसंपदा कमी होत आहे. त्यावर उपाय म्हणून रस्त्यांच्या कडेला तसेच डिव्हायडरमध्ये वृक्ष लागवड, रीप्लांटेशन केले जाणार आहे.

शहरातील पोवई नाका ते वाढे फाटा आणि भू-विकास बँक ते जुना आरटीओ चौक या रस्त्यांवर आवश्यक त्या ठिकाणी 1 जून रोजी वृक्षारोपण करण्यात येणार असून सातारा शहर ‘हरित’ करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केले.

सातारा शहर व परिसरातील वृक्षसंपदा वाढवणे, वृक्षांचे संवर्धन करणे आणि शहर व परिसर हरित करणे यासंदर्भात ना. शिवेंद्रराजे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, राहुल अहिरे, सातारा नगर पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यासह हरित सातारा संस्थेचे सुनील भोईटे, रामचंद्र साळुंखे, कन्हैयालाल राजपुरोहित, निखिल घोरपडे, प्रसन्न नलावडे, भालचंद्र गोताड, रेणू येळगावकर, नयना कांबळे, दिलीप भोजने, नाना केळकर, ड्रोगा निसर्ग संस्थेचे सुधीर सुकाळे, पोदार जम्बो किड्सच्या प्रिंसिपल विद्या धुमाळ उपस्थित होते.

रस्त्यांचे रुंदीकरण, काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण होत असल्याने अनेक ठिकाणचे मोठे वृक्ष, झाडे तोडली जात आहेत. सातारा शहरातील वृक्षसंपदा वाढवणे, जतन करणे यासाठी व्यापक कार्यवाही झाली पाहिजे, अशी मागणी उपस्थितांनी बैठकीत केली. सातारा शहर आणि परिसरात ठिकठिकाणी वृक्ष लागवड करुन त्यांचे जतन व संवर्धन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या उपक्रमाचा शुभारंभ दि. 1 जून रोजी पोवई नाका ते वाढे फाटा आणि भू विकास बँक ते जुना आरटीओ चौक येथे करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिका आणि लोकसहभागातून हा उपक्रम राबवला जाणार आहे. वृक्षारोपणासाठी निश्चित केलेल्या जागेवर खड्डे काढण्याच्या सूचना ना. शिवेंद्रराजे यांनी उपस्थित अधिकार्‍यांना केल्या. तसेच सावली देणारी आणि लवकर वाढणारी झाडे लावण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

बैठकीत झालेल्या चर्चेनंतर सोनचाफा, बकुळ, ताम्हिण, बहावा, बॉटल ब्रश, कडुलिंब, जांभूळ, नंदीवृक्ष, गोरख चिंच, पारिजातक, चिंच, आवळा, उंबर पुत्रवती, कांचन, भारतीय शिरीष, भेंडी, कदंब, पळस, अर्जुन, कुसूंबी आदी प्रकारची झाडे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. 1 जून रोजीच्या वृक्षारोपणासाठी आवश्यक ते नियोजन करण्याच्या सूचना ना. शिवेंद्रराजे यांनी उपस्थित अधिकार्‍यांना केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT