घरोघरीचे पाईप गॅस लाईन फिटींग धूळखात 
सातारा

Satara News : घरोघरीचे पाईप गॅस लाईन फिटींग धूळखात

साताऱ्यातील ग्राहक 4 वर्षांपासून प्रतिक्षेत : तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा शहर व परिसरात घरोघरी पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा केला जाणार असल्याने त्यामुळे अनेक नागरिकांनी गॅस लाईनसाठी फिटींग करुन घेतले. मात्र गेल्या 4 वर्षांपासून पाईपलाईनद्वारे पुरवठा करणाऱ्या गॅसच्या प्रतिक्षेत आहेत. गॅससाठी जोडलेली उपकरणे धूळखात पडल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

साताऱ्यात महामार्गावरुन पीएनजी गॅस पुरवठा लाईनचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. मात्र शहर परीसरातील नागरिकांनी पीएनजी गॅससाठी घरोघरी गॅस पाईपलाईनचे फिटींग केले आहे. 4 वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी अद्यापही घरोघरी गॅस पुरवठा झालेला नाही. पाईपलाईन गॅसचे घरोघरी फिटींग पूर्ण होवूनही गॅस पुरवठा न झाल्याने नागरिक त्रस्त आहेत. सुरक्षेसंदर्भातील तांत्रिक चाचण्या, मुख्य लाईनशी जोडणी झाली नाही. त्यामुळे सातारा शहर व परिसरातील अनेक भागात पाईपलाईन गॅस ग्राहकांच्या प्रतिक्षेतच राहिला आहे.

सिलिंडरची कटकट टाळण्यासाठी अनेक नागरिकांनी महागडे पीएनजी कनेक्शन घेतले. परंतू अनेक वर्षे उलटूनही गॅस न आल्याने नागरिकांना पुन्हा सिलिंडरवर अवलंबून रहावे लागत आहे. मात्र संबंधित यंत्रणेला अजून अंडर ग्राऊंड गॅसची पाईप लाईन टाकावयाची आहे. त्यानंतर गॅसचा पुरवठा होणार मग घरोघरी पाईप लाईन टाकून फिटींग करावयाची घाई कशासाठी केली. त्यामुळे गॅस फिटींग यंत्रणा धूळखात पडली आहे तर काही ठिकाणी त्याला गंजही लागला आहे. त्यामुळे नागरिकांचे हजारो रुपये वाया गेले की काय? अजून किती वर्षे पाईप लाईनद्वारे घरोघरी गॅस यायला वेळ लागणार असे विविध प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT