दुर्गम जगमीन गावातील चिमुरड्यांना शाळेत जाताना ओढा ओलांडण्याची जीवघेणी कसरत रोजच करावी लागत आहे. Pudhari Photo
सातारा

Satara News | शाळेत जाण्यासाठी चिमुरड्यांची जीवघेणी कसरत

दुर्गम जगमीन गावात विद्यार्थ्यांचा रोज थरार : विद्युत खांबाचा उभारला सेतू

पुढारी वृत्तसेवा
सोमनाथ राऊत

परळी : आपण तंत्र युगात प्रवेश केला आहे. नवनवीन शोध रोज लागत आहेत. एआयने तर जग बदलले आहे. असे असतानाही अजूनही सातार्‍याच्या जवळ असलेल्या डोंगरदर्‍यातील ग्रामस्थांना मूलभूत नागरी सुविधांसाठी जीव धोक्यात घालावा लागत आहे. मोठ्यांचे तर सोडाच शिक्षणासाठी चिमुरडी मुले पावसाळी दिवसातही जीवघेणा प्रवास करत आहेत.

परळी खोर्‍यातील दुर्गम जगमीन गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रोजच बाका प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. त्यांनी ओढा ओलांडून शाळेत जाण्यासाठी विजेच्या लोखंडी पोलचा आधार घेतला असून, या निसरड्या पोलवरून जाताना पाय घसरून ओढ्यात कोसळण्याची भीती असते. तरीही शाळेसाठी ही चिमुरडी रोजच जीवघेणा थरार अनुभवत आहेत.

निसर्गरम्य ठोसेघर धबधब्याचा जिथून उगम होतो तेच हे जगमीन गाव. येथील धरण परिसर पाहण्यासाठी हजारो पर्यटक येत असतात. मात्र, येथील स्थानिकांच्या मुलभूत गरजा कोणाच्याही नजरेत येत नाहीत. सुमारे 300 लोकसंख्या असलेले हे छोटसं गाव. गावात अजूनही बर्‍याच सोयीसुविधा नाहीत. गावाला जोडणारा कायमस्वरूपी रस्ता नाही. त्यामुळे येथील चिमुरड्या मुलांना ओढा ओलांडून शाळेत यावे लागत आहे.

पावसाळ्यातील तीन-चार महिने ओढ्याला पाणी असल्यामुळे या विद्यार्थ्यांना शाळेत जाणे म्हणजे जीवावर बेतल्यासारखे होते. काट्याकुट्यातून चिखल तुडवत निसरड्या वाटेने जाताना ओढा ओलांडण्याचे अग्निदिव्य रोजच करावे लागत आहे. ओढा ओलांडून ये - जा करण्यासाठी नागरिकांनी लोखंडी विद्युत खांब ओढ्यावर आडवे टाकले आहेत. या लोखंडी पुलाचा चिमुरड्यांसाठी सेतू उभारला आहे. यातून ये - जा करत असताना चिमुरड्यांना जीवघेण्या कसरती कराव्या लागत आहेत. पावसाची रिपरिप, चिखलाचा राडारोडा, निसरडा रस्ता, लोखंडी पुलावरील शेवाळलेला मार्ग अशा धोकादायक स्थितीतून जाताना विद्यार्थ्यांची स्थिती भयावह होत आहे. तोल सांभाळताना बाका प्रसंगाला सामोरे जावे लागते. पाय निसटला, घसरला तर ओढ्यात कोसळण्याची भिती असल्यामुळे ही चिमुरडी पाऊस जादा असेल तर शाळेत जायला धजावत नाहीत.

दरम्यान, पावसाळी दिवसात या परिसरात अतिवृष्टी व दाट धुके असते. पिके घेता येत नाहीत. वन्य प्राण्यांचा वावर असतो. यामुळे स्थानिक उदरनिर्वाहासाठी सातारा किंवा मुंबईची वाट धरतात. उन्हाळ्यात यात्रे-जत्रेला लोक येतात. इतर वेळी ही गावे मोकळीच असतात. कृषी विभाग, पर्यटन विभाग, प्रशासनाने या परिसरात स्थानिकांना रोजगार पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा येथील शेतकरी करीत आहेत.

प्रशासन, लोकप्रतिनिधींची उदासीनता

जगमीनच्या चिमुरड्यांची जीवघेणी कहानी थरारक आहे. शाळेत जाण्यासाठी कसरती कराव्या लागत आहेत. ‘जीव धोक्यात, पण मनी शिक्षणाची आस!’ या उक्तीप्रमाणे ही मुले जगमीनचा ओढा ओलांडून शाळेत जात आहेत. आपली गैरसोय आहे हेही या चिमुरड्यांच्या ध्यानीमनी नसते. असेच प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्याही मनी नसेल ना? प्रशासनही सारं काही उघड्या डोळ्यांनी बघून झोपेचं सोंग घेऊन आहे. जगाच्या नकाशावर जगमीन हे गाव नसल्याप्रमाणे प्रशासन वागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT