Child marriage pudhari photo
सातारा

Satara Child marriage case: लग्नाची सनई वाजण्यापूर्वीच घुमला सायरन, पोलिस व बालकल्याण समितीच्या तत्परतेने रोखला बालविवाह

रहिमतपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावाबाहेरील मंदिरात हा विवाह सोहळा पार पडणार होता

पुढारी वृत्तसेवा

कोरेगाव : एका अल्पवयीन बालिकेचे बालपण अंधारात ढकलणारा एक बेकायदेशीर बालविवाह रहिमतपूर पोलिस आणि बाल संरक्षण यंत्रणेनेच्या सतर्कतेमुळे वेळेत रोखण्यात आला. रहिमतपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावाबाहेरील मंदिरात हा विवाह सोहळा पार पडणार होता. मात्र पोलिसांनी अत्यंत संवेदनशीलतेने आणि वेगाने कारवाई करत या बालिकेची सुरक्षित सुटका केली असून तिला कायद्याचे संरक्षण मिळवून दिले.

रहिमतपूर पोलिस स्टेशन हद्दीत दि. २६ जून रोजी एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती सपोनि विनोद नेवसे यांना मिळाली. माहिती मिळताच रहिमतपूर पोलिसांच्या पथकाने तत्काळ संबंधित विवाह स्थळी धाड टाकली. त्याठिकाणी विवाहाची तयारी सुरू होती. तसेच २५ ते ३० नातेवाईक उपस्थित होते. पोलिसांनी तिथे जात विवाह थांबवला आणि नवरी मुलीच्या वयाच्या अधिकृत कागदपत्रांची बारकाईने पडताळणी केली. तेव्हा मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचे निष्पन्न झाले.

मुलगी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट होताच रहिमतपूर पोलिसांनी तत्काळ कोरेगाव येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी, शारदा जाधव व ग्रामविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. महिला पोलिस अंमलदारांच्या मदतीने बालिकेला सुरक्षितपणे आणि विश्वासात घेऊन तिच्या नातेवाईकांसह पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी तयार केलेल्या सविस्तर अहवालाच्या आधारे, सदर बालिकेला तात्काळ सातारा जिल्हा बाल कल्याण समिती, समोर हजर करण्यात आले. ही कारवाई रहिमतपूर पोलीस स्टेशनची सपोनि विनोद नेवसे, पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, पोलीस हवालदार प्रवीण बर्गे, शंकर घाडगे, महेश शेडगे, सुशांत शिंदे, महिला पोलीस हवालदार शितल सानप, पोलीस कॉन्स्टेबल समाधान देशमुख, संजय सपकाळ, तुषार काळंगे, अश्विनी घाडगे, शुभांगी पाटोळे, अर्पिता गायकवाड यांच्यासह बाल विकास प्रकल्प अधिकारी शारदा जाधव यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT