सातारा : ऐतिहासिक सातारा शहराचा पर्यटनात्मक विकास व्हावा, ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व्हावे यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणाऱ्या ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला आज मोठे यश मिळाले आहे. शिवतीर्थ, पोवई नाका येथे छत्रपती शिवरायांचा २५ फूट उंचीचा भव्यदिव्य पुतळा उभारण्यासाठी तसेच शिवतीर्थ परिसर विकसित करण्यासाठी तब्बल ५ कोटी ७५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ना. शिवेंद्रराजेंच्या मागणीवरून उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी २४ तासांच्या आत निधीला मंजुरी दिली आहे. निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल ना. शिवेंद्रराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. एकनाथ शिंदे आणि ना. सुनेत्राताई पवार यांचे आभार मानले आहेत.
सातारा शहराचा विकासात्मक कायापालट सुरु असून सातारा शहरातील ऐतिहासिक आणि महत्वाचे ठिकाण असलेल्या शिवतीर्थ परिसराचे सुशोभीकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य २५ फूट उंचीचा नवीन पुतळा उभारण्यात यावा, तसेच याठिकाणी पुतळा विषयक अनुज्ञेय विकासकामे करण्यासाठी भरीव निधी उपलब्ध व्हावा, यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा पाठपुरावा सुरु होता. ना. शिवेंद्रराजेंच्या सूचनेनुसार तसा परिपूर्ण प्रस्ताव सातारा नगरपालिकेने नगर विकास विभागाकडे पाठवला होता. दरम्यान, गुरुवार दि. १२ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे गावी मुक्कामी आले होते. हे समजल्यानंतर ना. शिवेंद्रराजे हे सायंकाळी साताऱ्यातून तातडीने दरे गावी रवाना झाले. दरे येथे ना. शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन ना. शिवेंद्रराजेंनी त्यांची भेट घेतली. यावेळी सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, नगरसेवक अविनाश कदम, फिरोज पठाण उपस्थित होते.
ना. शिवेंद्रराजे यांनी शिवतीर्थ पोवई नाका येथे छत्रपती शिवरायांचा २५ फुटी पुतळा तसेच त्यासाठीचा १५ फुटांचा चबुतरा उभारणी व या अनुषंगाने आवश्यक कामे प्रलंबित असल्याचे सांगून हे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी नगरविकास विभागाकडून त्वरित निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी ना. शिंदे यांच्याकडे केली. ना. शिंदे यांनी तात्काळ मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनी करुन त्वरित निधी उपलब्ध करुन देण्याच्या सूचना केल्या. तसेच ना. शिवेंद्रराजे यांच्या मागणीला गांभीर्याने घेऊन ना. शिंदे यांनी या कामाला हिरवा कंदील दाखवला होता. शुक्रवार दि. १३ रोजी सकाळीच नगरविकास विभागाने ‘नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेतून’ सदर कामासाठी ५ कोटी ७५ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला. ना. शिवेंद्रराजेंनी मागणी केल्यानंतर २४ तासांच्या आत ना. शिंदे यांनी हा निधी मंजूर केल्याने समस्त सातारकरांमधून समाधान व्यक्त होत आहे.
निधी मंजूर झाल्याने पोवई नाका येथील शिवतीर्थावर लवकरच भव्यदिव्य शिवपुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा निधी मंजूर झाल्यानंतर नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसराची पाहणी करुन अभिवादन केले. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे आभार मानले. यावेळी गटनेते अविनाश कदम, शिक्षण सभापती शंकर किर्दत, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नगरसेवक जयवंत भोसले, विजय देसाई, राजू गोरे, सुशांत महाजन, सुनीलकुमार भंडारी आदि उपस्थित होते.
आहे तसाच पण भव्य पुतळा उभारणार...
शिवतीर्थ येथे तोफेवर हात ठेवलेला शिवपुतळा असून हुबेहूब तसाच नवीन २५ फुटी शिवपुतळा उभारण्यात येणार आहे. हा नवीन पुतळा भारताचे ख्यातनाम, सुप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे सुपुत्र अनिल सुतार यांनी साकारला आहे. चबुतऱ्याची उंची १५ फूट आणि २५ फुटी पुतळा अशी एकूण ४० फूट उंची असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य आणि शहराच्या सौंदर्यात अधिक भर टाकेल, असा भारदस्त शिवपुतळा लवकरच उभारण्यात येईल, असे ना. शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केले आहे.