pudhari photo
सातारा

Satara Panchayat Samiti: सातारा पंचायत समिती सभापतीपदावर भाजपचा झेंडा

तिघे जण शर्यतीत : ना. शिवेंद्रराजे करणार शिक्कामोर्तब

पुढारी वृत्तसेवा
शिवाजी कदम

कोडोली : सातारा पंचायत समितीचा सभापती प्रथमच भाजपचा होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. सभापतीपदासाठी राहुल शिंदे, प्रभाकर पवार आणि महेश गाडे यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार, हे ना. शिवेंद्रराजे भोसलेच ठरवणार आहेत. त्यामुळे कुणाला संधी मिळणार याची उत्सुकता ताणली गेली आहे.

सातारा पंचायत समितीत सोमवार, दि. 16 मार्च रोजी सभापती व उपसभापती पदासाठी नवनिर्वाचित सदस्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. एकूण 16 सदस्य असलेल्या पंचायत समितीत भाजपचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे 5 आणि शिवसेना शिंदे गटाचा 1 सदस्य निवडून आला आहे.

दरम्यान, स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या काळापासून पंचायत समितीचे कामकाज त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होते. त्यांच्या निधनानंतर ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सत्तेचे सूत्र एकहाती राहिले आहेत. त्यामुळे सभापती व उपसभापतीपदासाठी बंद पाकिटातून जे नावे सुचवले जातील, त्यांनाच पदाची संधी मिळणार अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे.

सभापतीपदाच्या शर्यतीत पाटखळ गणाचे सदस्य राहुल शिंदे हे आघाडीवर मानले जात आहेत. त्यांना पंचायत समिती सभागृहाचा दोन टर्मचा अनुभव आहे. तालुक्याच्या समतोल विकासासाठी सत्ताधारी व विरोधकांना सोबत घेऊन काम करण्याचा त्यांचा अनुभव असल्याचे मानले जाते. तर लिंब गणाचे सदस्य प्रभाकर पवार आणि कोंडवे गणाचे सदस्य महेश गाडे हे नवखे सदस्य असून अनुभवी राहुल शिंदे यांना संधी मिळणार की नवख्या उमेदवारांना संधी दिली जाणार, याकडेही तालुक्याचे लक्ष लागले आहे.गेल्या वेळी सभापतीपद सातारा तालुक्यातील पश्चिम भागात होते. त्यामुळे यावेळेस शिवेंद्रराजे पूर्वभागाला न्याय देतील, असे बोलले जात आहे.

उपसभापतीपदाची निवड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या समीकरणावर ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महायुती सरकारच्या धोरणानुसार जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे वाटप झाल्यास सातारा पंचायत समितीचे उपसभापतीपद महायुतीतील घटक पक्षाला देण्याची शक्यता आहे. असे झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच सदस्यांपैकी एखाद्याच्या गळ्यात उपसभापतीपदाची माळ पडू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT