लोणंद : निरा येथे वास्तव्यास असलेले व चादर विक्रीचा व्यवसाय करणारे काही जण सोमवारी सायंकाळी कपडे धुणे व पोहण्यासाठी पाडेगाव कॅनॉल परिसरात गेले होते. यावेळी एक साथीदार बुडाला, त्याच्या मदतीसाठी दुसरा धावला. पोहता येत नसतानाही पाण्यात उडी मारून त्याने पहिल्या साथीदाराला मिठी मारल्याने दोघेही वाहून गेले.
मंगळवारी सायंकाळी यापैकी एकाचा मृतदेह पाडेगाव हद्दीत सापडला. वाहून गेलेल्या दुसऱ्या युवकाचा शोध सुरू आहे. पाडेगाव हद्दीतील वीर धरणाच्या कालव्यात ही दुर्घटना घडली. शेख अझरूद्दीन फकरूद्दीन (वय 20) याचा मृतदेह सापडला असून वाहून गेलेला दुसरा साथीदार सादिक खान (22) याचा शोध सुरू आहे.
सादिक व शेख अझरूद्दीन हे मूळचे कासोदा (ता. एरंडोल, जि. जळगाव) येथील आहे. कॅनॉलमध्ये सादिकचा पाय घसरल्याने तो कालव्यात पडला. सादिक बुडू लागल्याचे लक्षात येताच त्याला वाचवण्यासाठी शेख अझरूद्दीन याने तत्काळ कालव्यात उडी घेतली.