सातारा : शाहूनगरमध्ये गुरुकुल शाळेच्या पाठीमागे असलेल्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये आढळून आलेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांपैकी एक बछडा अजूनही त्याच्या आईच्या प्रतीक्षेत आहे. शुक्रवारी रात्री संबंधित ठिकाणी या बछड्याला ठेवण्यात आले होते. मात्र, बिबट्या फिरकलाच नाही. त्यामुळे शनिवारी पुन्हा एकदा वन विभागाच्या वतीने हा बछडा या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे.
येथील बांधकाम रखडलेल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये स्थानिक लोकांना दि. 26 नोव्हेंबरच्या रात्री बिबट्याची दोन पिल्ले आढळून आली होती. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही पिल्ले ताब्यात घेतली होती. तसेच परिसरामध्ये सर्च ऑपरेशन राबवून बिबट्याचा शोध घेण्यात आला; परंतु बिबट्या आढळून आला नव्हता.
गेल्या तीन दिवसांपासून सापडलेल्या दोन पिल्लांचे त्यांच्या मातीसोबत भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. गुरुवारी रात्री ठेवलेला बिबट्याचा बछडा त्याच्या आईने उचलून दूर जंगलात नेला. बिबट्याचा जो बछडा अशक्त होता त्याला त्याच्या मातेने जंगलात नेले. परंतु जो सशक्त बछडा आहे तो अजूनही नेलेला नाही. शनिवारी रात्री पुन्हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बछड्याला त्याच ठिकाणी ठेवले.