Udayanraje, Shivendraraje 
सातारा

Satara Dahi Handi Celebration: साताऱ्यात दोन्ही राजेंनी धरला ठेका

‘उदयनराजेंची स्टाईल इज स्टाईल’ , शिवेंद्रराजेंचा कार्यकर्त्यांसोबत डान्स

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा शहरात सध्या दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. बुधवार नाका परिसरात आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती दहीहंडी उत्सवात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या अस्सल 'राजे' अंदाजाची झलक पाहायला मिळाली. डॉल्बीच्या दणदणाटात गाडीमध्ये बसूनच उदयनराजेंनी कॉलर उडवत धरलेला ठेका उपस्थितांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने बुधवार नाका परिसरात कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. डॉल्बीच्या तालावर तरुणाईचा जल्लोष सुरू असतानाच खा. उदयनराजे भोसले यांची गाडी तेथे आली. उत्सवाचा माहोल पाहून त्यांनी गाडीत बसूनच डॉल्बीच्या ठेक्यावर ताल धरला. यावेळी कॉलर उडवत त्यांनी व्यक्त केलेला उत्साह पाहून कार्यकर्त्यांनीही एकच जल्लोष केला. उदयनराजेंचा हा दिलखुलास अंदाज अनेकांनी मोबाईल कॅमेर्‍यात कैद केला. काही क्षणांतच हा प्रसंग उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय ठरला. राजकीय व्यासपीठावरील आपली खास शैली आणि कार्यकर्त्यांशी असलेला थेट संवाद यासाठी ओळखल्या जाणाऱ्या उदयनराजेंचा उत्सवातील हा अंदाजही तितकाच रंगतदार ठरला.

‘उदयनराजे स्टाईल इज स्टाईल’ अशीच चर्चा यावेळी कार्यकर्त्यांमध्ये रंगली. उत्सवाचा जल्लोष, डॉल्बीचा ठेका आणि त्यावर कॉलर उडवत ताल धरणारे उदयनराजे यांचा हा अंदाज सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.

शिवेंद्रराजेंचा कार्यकर्त्यांसोबत डान्स

साताऱ्यातील राजवाडा परिसरातील गांधी मैदानावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले मित्रसमूहाच्यावतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी उत्सव २०२६ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरले ते मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा कार्यकर्त्यांसोबतचा उत्स्फूर्त सहभाग.

या दहीहंडी स्पर्धेसाठी तब्बल ५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. त्यामुळे दहीहंडी पाहण्यासाठी सातारा शहरासह परिसरातील नागरिकांनी तसेच विविध गोविंदा पथकांनी गांधी मैदानावर मोठी गर्दी केली होती. उत्सवात विविध गोविंदा पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत दहीहंडी फोडण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. अखेर भैरवनाथ तालीम गोविंदा पथक, मेढा यांनी थरावर थर रचत उत्कृष्ट कामगिरी केली आणि मानाची दहीहंडी फोडण्याचा मान पटकावला. गोविंदांनी दहीहंडी फोडताच मैदानावर उपस्थित नागरिकांनी जल्लोष करत विजेत्या पथकाचे अभिनंदन केले.

दरम्यान, कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांच्या विशेष आग्रहाखातर मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनीही उत्सवाच्या आनंदात सहभाग घेतला. गाण्याच्या तालावर त्यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला. ढोल-ताशांचा कडकडाट, गोविंदांचा उत्साह, तरुणाईचा जोश आणि नागरिकांची अलोट गर्दी यामुळे गांधी मैदानावरील दहीहंडी उत्सवाला मोठी रंगत आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT