नागठाणे : पुणे-बंगळूर महामार्गावर बोरगाव (ता. सातारा) गावाच्या हद्दीत कार व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीवरील युवक ठार झाला. सागर सुभाष शिवणकर (रा. खर्षी तर्फ कुडाळ, ता. जावली, जि. सातारा) हा या अपघातात ठार झाला. सागर शिवणकर हा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत नागठाणे शाखेत लेखनिक म्हणून कार्यरत होता.
याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी 9.30 च्या दरम्यान सागर हा सकाळी नेहमीप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत कामासाठी जात असताना बोरगाव येथील हॉटेल पानेरीच्या समोर असताना त्यांच्या दुचाकीला मागून साताराकडून कराडच्या दिशेने निघालेल्या कारने जोरदार धडक दिली. या धडकेनंतर सागर शिवणकर जखमी अवस्थेत गाडीवरून खाली जोरात कोसळला. ही धडक एवढी जोराची होती की दुचाकीचा पूर्ण चक्काचूर झाला. या घटनेची माहिती कळताच बोरगावचे अपघात विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर भोसले, संजय जाधव या कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेतली.
पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी शिवणकर याला सातारा जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणी कारचालक ओमकार कृष्णा दळवी (रा.बड्याचीवाडी ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.