सातारा-पुणे महामार्गावर बोपेगाव येथे टँकरने घेतलेला पेट. Pudhari Photo
सातारा

Satara Fire Incident | बोपेगाव येथे गँस टँकरला भीषण आग

शॉर्टसर्किटमुळे घटना : महामार्गावर वाहनांच्या रांगा

पुढारी वृत्तसेवा

कवठे : पुणे- सातारा महामार्गावर बोपेगावच्या हद्दीत भरधाव वेगात जाणार्‍या रिकाम्या गॅस टँकरला शॉर्टसर्किटमुळे रविवारी दुपारी भीषण आग लागली. यात ट्रकच्या केबिनमध्ये आग लागली व डिझेलची टाकी पेटून फुटल्याने आगीचा भडका उडाला. या घटनेमुळे महामार्गावर एकच खळबळ उडाली. टाकी फुटल्याने मोठा आवाज झाल्याने घबराट पसरली होती. दरम्यान, या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

याबाबत मिळालेली माहिती अशी, बोपेगाव, ता. वाई नजीक सातारा ते पुणे लेनवरुन गॅस टँकर पुण्याच्या दिशेने निघाला होता. हा टँकर बोपेगावच्या हद्दीत आला असता टँकरमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आग लागल्याचे चालकाच्या निदर्शनास आले असता बोपेगावचा उड्डाणपूल ओलांडून ट्रक बोपेगाव व कवठे दरम्यानच्या सेवा रस्त्यावर वळवून रस्त्याकडेला थांबवला. तोपर्यंत केबिनला पूर्ण आगीने वेढा घातला होता. यानंतर चालकाने क्लीनर बाजूने दरवाजा उघडून केबिनमधून सुटका करून घेतली. या दरम्यान चालक आगीत जखमी झाला आहे. त्याच्यावर कवठे ता वाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले .

या घटनेची माहिती मिळताच भुईंजचे सपोनि सूरज शिंदे, दत्तात्रय शिंदे आणि महामार्ग पोलिस यंत्रणेचे सपोनि बी.सी. वंजारी, बाजीराव वाघमोडे घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी तातडीने वाई पालिकेच्या अग्निशामक दलाला पाचरण केले. टँकरला आग लागल्यानंतर महामार्गाच्या पुणे- सातारा लेनवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे अग्निशामक यंत्रणेला घटनास्थळावर पोहोचण्यास कसरत करावी लागली. अग्निशामक टँकर घटनास्थळी आल्यानंतर काही वेळातच आग आटोक्यात आली. यानंतर महामार्ग व भुईंज पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान, 29 ऑक्टोबर 1987 या दिवशी कवठे ता. वाई या गावात भीषण पेट्रोल टँकर स्फोटात 46 मृत तर 35 हून अधिक भाजून जखमी झाले होते. त्यामुळे कवठे गावावर मरणकळा पसरली होती. आजच्या कवठे बोपेगाव हद्दीतील या घटनेमुळे कवठेकरांच्या अंगावर शहारे आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT