Death  File Photo
सातारा

Satara News : विहिरीत मृतदेह आढळल्याने शेडगेवाडीत खळबळ

दोन ते तीन दिवस मृतदेह पाण्यात; विहिरीतील पाणी दूषित झाल्याने ग्रामस्थांना टँकरचा आधार

पुढारी वृत्तसेवा

मारुल हवेली : शेडगेवाडी (ता. पाटण) येथील गावातील विहिरीत गावातीलच एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. सदर मृतदेह दोन ते तीन दिवस विहिरीतील पाण्यात असल्याचे सांगण्यात येत असून, या घटनेमुळे विहिरीतील पाणी दूषित झाले आहे. मल्हारपेठ पोलिसांनी मंगळवारी मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

दत्तात्रय कृष्णा थोरात (वय ३५, रा. शेडगेवाडी, ता.पाटण) असे मृतदेह आढळून आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत नितीन राजाराम यादव (रा. शेडगेवाडी) यांनी मल्हारपेठ पोलिसांत खबर दिली. त्यानुसार दत्तात्रय थोरात हे दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजण्यापूर्वी शेडगेवाडी येथील गावातील विहिरीत पाण्यात पडून मृत झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी मल्हारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मृतदेह विहिरीत दोन ते तीन दिवस राहिल्याने विहिरीतील पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून विहिरीतील दूषित पाण्याचा उपसा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तसेच आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार विहिरीतील पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून प्रयत्न सुरू आहेत. या अकस्मात मृत्यूचा पुढील तपास मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार पाटील करीत आहेत. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

गावाला टँकरव्दारे पाणी पुरवठा...

दरम्यान, विहिरीतील पाणी वापरता येत नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये यासाठी गावात टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ग्रामस्थांनी दूषित पाण्याचा वापर करू नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT