Satara news: पेरलेच्या स्मशानभुमीत काळी बाहुली अन्‌‍ लिंबू Pudhari
सातारा

Satara news: पेरलेच्या स्मशानभुमीत काळी बाहुली अन्‌‍ लिंबू

अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रकार; नागरिकांमध्ये तीव्र संताप

पुढारी वृत्तसेवा

उंब्रज : पेरले ता. कराड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी शव वाहीनीवर गेल्या अनेक महिन्यांपासून प्रत्येक अमावस्येला हळद, कुंकू, लिंबू, नारळ, मृत अवस्थेतील कोंबड्या, आदी वस्तू एका बॉक्समध्ये आढळून येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असून परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान पोलिस व स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने सदर प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

याबाबत घटनास्थळावरून स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पेरले येथील स्मशानभूमीत बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी पेरले येथील स्मशानभूमीतील शव वाहीनीवर ( जेथे अंत्यसंस्कार केले जातात तेथे ) दोन बॉक्स आढळून आले असून , या बॉक्समध्ये हळद, कुंकू, लिंबू, नारळ, मृत अवस्थेतील कोंबड्या आदी आढळून आले. मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी अमावस्या होती. त्यामुळे सदरचा प्रकार हा अंधश्रद्धेतून झाला असावा असा अंदाज नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. सदरचा प्रकार हा जाणीवपूर्वक केला जात असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. स्मशानभूमीसारख्या सार्वजनिक व संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारच्या कृतीमुळे सामाजिक अस्वस्थता निर्माण होत असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

“स्मशानभूमी ही अत्यंत पवित्र व सार्वजनिक जागा आहे. येथे अशा प्रकारे लिंबू, मिरची, नारळ ठेवून अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न होणे ही गंभीर बाब आहे. संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाने परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बसवून परीसर सीसीटीव्ही कॅमेराच्या देखरेखीखाली ठेवून गावात जनजागृती मोहिम राबवून अंधश्रद्धेविरोधात ठोस भूमिका घ्यावी, अशीही मागणी पुढे येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT