Satara Politics Pudhari
सातारा

Satara politics: भाजपचा मानपान की राष्ट्रवादी-शिवसेना जपणार स्वाभिमान?

जिल्हा परिषदेत सत्ता कुणाची? : नोटिफिकेशनकडे लागल्या सर्वांच्या नजरा

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. भाजपने डावललेले राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेते अजूनही नाराज आहेत. त्यातच ग्रामविकास विभागाने दि. 20 मार्चपूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच पंचायत समित्यांच्या सभापतींची निवड करण्याचे आदेश काढले आहेत. आता पुन्हा एकदा सत्तास्थापनेचा राजकीय रंगारंग सुरू झाला असून राष्ट्रवादी व शिवसेना स्वाभिमान जपणार की भाजपचा मानपान करणार, याबाबत जिल्ह्यातील जनतेला उत्सुकता लागली आहे.

महाराष्ट्र शासनच्या ग्रामविकास विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दि. 20 मार्चपूर्वी अध्यक्ष व सभापती पदांची निवड करण्यासाठी पहिली बैठक घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे पदाधिकारी निवडीच्या नोटिफिकेशनकडे ग्रामीण जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे 27, राष्ट्रवादीचे 20, शिवसेनेचे 15 तर काँग्रेस 1, स्वाभिमानी 1 तर अपक्ष 1 असे बलाबल झाले आहे. जिल्ह्याच्या जनतेने कुठल्याही पक्षाला बहुमत दिलेले नाही. त्यामुळे बहुमताची 33 इतकी सदस्य संख्या गाठण्यासाठी या तिन्ही पक्षांनी प्रयत्न सुरू केले. सगळ्यात आधी राष्ट्रवादी व शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकत्रित येत सत्तास्थापनेच्या अनुषंगाने हालचाली केल्या. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सदस्यांचा गट जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदवून आपल्या सदस्यांना अज्ञातस्थळी नेले. जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप फोडाफोडीचे राजकारण खेळणार, हे लक्षात घेवून या दोन्ही पक्षांनी सावध पावले टाकली. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या निकालाला 18 दिवस उलटून देखील अजूनही सत्ता स्थापनेचा सस्पेन्स कायम आहे.

जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांमध्येही सत्तासंघर्ष आहे. वाई, खंडाळा, कोरेगाव या पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादीचे बहुमत आहे. तर सातारा, खटाव, कराड या पंचायत समित्यांवर भाजपचा झेंडा फडकणार आहे. पाटण पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात आली आहे. मात्र, महाबळेश्वर, जावली, माण, फलटण या पंचायत समित्यांमध्ये सत्तेचे त्रांगडे आहे. महाबळेश्वर, जावली या दोन्ही पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात. ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील सत्ता स्थापनेच्या अनुषंगाने उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. भाजप सत्ता स्थापन करण्यासाठी काहीही करु शकतो, अशी जोरदार चर्चा जिल्ह्यात आहे. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना-राष्ट्रवादीच सत्तेवर येणार, असा अंदाजही वर्तवला जात असल्याने राजकीय धुरळा चांगलाच उडाल्याचे चित्र आहे.

पालकमंत्री मिठी मारणार का?

नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीमध्ये महायुती करण्यासाठी दोनदा पुढाकार घेतला. आपण पुढे केलेला हात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी हातात घेतला नाही, म्हणत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अपमान गिळल्याचे म्हटले होते. तर आता आम्ही पालकमंत्र्यांना मिठी मारायलाही तयार आहोत, अशी साद सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. मात्र,अजूनही दोघांची मिठी बघायला मिळालेली नाही. आता पुढे हे दोघे एकमेकांना मिठी मारणार की छत्तीसचा आकडा ठेवणार, याबाबतही उत्सुकता आहे.

आधी पंचायत समिती नंतर जिल्हा परिषद

पंचायत समिती सभापती निवडीसाठी सात दिवस आधी तर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी दहा दिवस आधी नोटीफिकेशन काढावे लागते. पंचायत समित्यांसाठी प्रांताधिकारी तर जिल्हा परिषदेसाठी जिल्हाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर करतात. पंचायत समितीच्या सभापतींची निवड झाल्यानंतर मग जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची निवड होणार आहे.

माण, फलटणला ड्रामा

माण व फलटण पंचायत समित्यांमध्ये हायहोल्टेज ड्रामा रंगणार आहे. फलटणमध्ये शिवसेना 8 व भाजप 8 तर माणमध्ये राष्ट्रवादी 5 व भाजप 5 अशी सदस्य संख्या आहे. दोन्ही ठिकाणी टाय झाले असल्याने सत्तास्थापनेसाठी ईश्वरचिठ्ठीचा आधार घ्यावा लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT